
उन्हाच्या काहिलीमुळे वैतागल्यानंतर कधी एकदा हिवाळा सुरू होतो, असं झालेलं असतं, हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर सर्दी, खोकला, पडसं, ताप, यासारखे आजार सर्रास होऊ शकतात. हिवाळ्यात कानदुखीची समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. थंड हवामान आणि वाऱ्यामुळे कान दुखू शकतो. या त्रासामागे इतररही अनेक कारणे असू शकतात.
कान दुखण्याच्या समस्येवर वेळीच काळजी घेतली नाही तर ही वेदना डोक्यात पसरते. तज्ज्ञांच्या मते, कानाच्या आतील रचना अतिशय नाजूक असते आणि त्यामधील नसा आणि मज्जासंस्था मेंदू आणि घसा यांना जोडतात. जाणून घेऊया कान दुखण्यामागील कारणे आणि त्यावरील उपाय
संसर्ग
अनेक वेळा कानदुखीची समस्या सर्दी झालेल्या लोकांमध्येही आढळते. कानाला घशात जोडणाऱ्या युस्टेशियन ट्युबद्वारे जीवाणू कानात जातात. हिवाळ्यात कान दुखण्यामागे संसर्ग हे एक प्रमुख कारण असू शकते. संसर्गामुळे, कानातून द्रवदेखील वाहू लागतो.
भरलेले नाक
काही वेळा घसा आणि कानाला जोडणाऱ्या युस्टेशियन ट्यूबमध्ये रक्तसंचय झाल्यामुळेही वेदना सुरू होतात. ही समस्या हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते.
वारंवार सर्दी आणि खोकला
वारंवार खोकणे आणि शिंकणे यामुळे आतील कानात ताण येतो. नसांमध्ये दाब येतो त्यामुळे वेदना सुरू होतात. म्हणून जर एखाद्याला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल, तर त्याने ताबडतोब आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सायनस
हा त्रास असलेल्या लोकांनादेखील जोरदार शिंक येते. ज्यामुळे कानात वेदना सुरू होतात.
थंड वारा
कानाच्या मज्जातंतूंवर थंड वाऱ्याचा फार झपाट्याने परिणाम होतो, त्यामुळे अनेकदा वाऱ्याच्या संपर्कात येताच वेदना सुरू होतात. म्हणूनच हिवाळ्यात जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा कान झाकूनच घराबाहेर पडा.
वेदना टाळण्यासाठी टिप्स
– कान झाकून ठेवा आणि थंड हवेचा थेट संपर्क टाळा.
– सायनसची समस्या, खोकला आणि सर्दी असलेल्यांनी हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी.
– कान स्वच्छ करण्यासाठी हेअरपिन किंवा मॅचस्टिकसारखे काहीही वापरू नका.
– आरोग्य तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय कोणत्याही प्रकारचे द्रव किंवा औषध कानात टाकू नका.
– किरकोळ लक्षणे असली, तरीही ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कारण उपचारास उशीर झाल्यास संसर्ग वाढू शकतो.































































