
अतिव्यस्त, धावपळीच्या जीवनशैलीमुळे वजन कमी करण्यासाठी कसा वेळ द्यायचा, असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. ज्यांना व्यायाम आणि डाएटिंगशिवाय वजन कमी करायचे आहे, त्यांनी काही सोप्या टिप्स जाणून घेऊन लठ्ठपणावर कायमस्वरुपी मात करता येऊ शकते.
बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकालाच आपण सडपातळ-सुदृढ असावे, असे वाटत असते. आरोग्याचे खरे रहस्य लठ्ठपणात नसले तरी लठ्ठपणापासून कायमची सुटका करून घेणे, हा आजचा मोठा प्रश्न आहे. काही लोकांना वाटते की, काटेकोर आहारामुळे यापासून सुटका करून घ्यावी, मात्र आहाराचे काटेकोर पालन केले तरी अनेक वेळा शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. वय वाढल्यावर अतिव्यायामामुळेही शरीराचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच ज्यांना नियमित आहार आणि व्यायामाशिवाय सहजतेने वजन कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूया.
– मैदा, व्हाईट ब्रेड, पास्ता आणि इतर रिफाइंड कार्ब्स यांचा आहारात समावेश करू नका. रिफाइंड कार्ब्समधील शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्त्वे आणि फायबर नष्ट झालेले असते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. यासाठी आहारात कोंडायुक्त पिठाचा समावेश करून मैद्याचा वापर शक्यतो अत्यंत कमी किंवा करूच नका.
– भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर पडण्यास मदत होईल. याकरिता गरम पाणी प्या. यामुळे शरीरातील अतिरिक्त मेद सहजरित्या कमी होऊ शकतो. दररोज सकाळी रिकाम्यापोटी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया चांगली राहते आणि वजन कमी होण्यासाही मदत होते.
– वजन कमी करण्यासाठी साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, अतिरिक्त साखरेमुळे शरीरातील अन्न पचनाचा वेग मंदावतो. त्याचा थेट परिणाम वजनावर होतो. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर साखर आणि गोड पदार्थांचे सेवन कमी करा. मिठाई किंवा गोड पदार्थ खायला अवडत असतील तर गूळ किंवा मधाचे सेवन करणे खूप चांगले आहे.
– वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील मेद कमी होतो. दोन-तीन ग्रीन टी नियमितपणे प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रियाही वाढते आणि शरीर डिटॉक्सिफायही होते. आवडीनुसार यामध्ये लिंबू पाणी मधासोबत पिऊ शकता किंवा पाण्यात जिरे किंवा सेलेरी उकळून पिऊ शकता. यामुळे शरीरातील चयापचयदेखील वाढते.
– आहारात तेलाचे प्रमाण कमी असावे. स्वयंपाक करताना रिफाईंड तेलाचा वापर करू नका. शेंगदाण्याचे तेल, राईसब्रेन तेल, मोहरीचे तेल अशा प्रकारच्या तेलातही आरोग्यासाठी चांगले घटक असतात. जे रिफाइन करून काढू टाकले जातात त्यामुळे वजन कमी होण्याएवजी वजन वाढू शकते.





























































