
घसा खवखवणे हे कोरोना विषाणूच्या मुख्य लक्षणांपैकी एक लक्षण आहे, परंतु कोरोनाशिवाय घसा खवखवण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. जाणून घेऊया घसा खवखवण्याची काही कारणे आणि त्यावरील उपाय.
हिवाळा आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्या घेऊन येतो, असे म्हणतात. थंड वारे आणि प्रदूषणामुळे घसादुखी, सर्दी, खोकला, पडसे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. या ऋतूमध्ये सकाळी उठल्यानंतर नाक बंद होणे, चेहऱ्यावर सूज येणे, घसा खवखवणे, असे त्रासही होतात. या दिवसांत अनेकांना सकाळी उठल्यावर प्रामुख्याने जाणवणारी समस्या घसादुखी किंवा घसा खवखवणे. तुम्हालासुद्धा सकाळी उठल्यानंतर घसादुखीच्या समस्येला सामोरे जावे लागू का ? जाणून घेऊया या त्रासाविषयी –
जंतुसंसर्ग
घसा खवखवणे हे कोरोना व्हायरसच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. याशिवाय नाक वाहणे, थकवा येणे, अंगदुखी, शिंका येणे, उलट्या होणे आणि झोपेत घाम येणे हीदेखील कोरोना विषाणूची इतर काही लक्षणे आहेत, मात्र घसा खवखवणे, घसादुखी, सर्दी, गोवर, कांजण्या, तसेच मोनोन्यूक्लिओसिससह इतर संसर्गजन्य आजारांमुळेसु्द्धा घसा दुखू किंवा खवखवू शकतो. ताप, खोकला, अंगदुखी, वाहणारे नाक, टॉन्सिल सुजणे आणि घसा बसणे यामुळे घसा खवखवू शकतो. काही विषाणूजन्य आजारांमुळे घशाला रॅशेस आणि त्वचेशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
वायू प्रदूषण
आजच्या काळात हवेच्या घटत्या गुणवत्तेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. वायू प्रदूषणामुळे कोरडेपणा, घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवतात. एखाद्या व्यक्तीला त्वचेला खाज सुटणे, खोकला, घरघर, श्वासोच्छवासाचा त्रास, डोळ्यांमध्ये जळजळ, नाकात जळजळ आणि वायू प्रदूषणामुळे रक्तदाब वाढणे यांचा सामना करावा लागतो.
कोरडी हवा
हिवाळ्यात हवा खूप कोरडी होते. त्यामुळे घसा खवखवायला सुरुवात होते. अशावेळी स्वतःला हायड्रेटेड ठेवणेदेखील खूप महत्त्वाचे आहे.
ऍलर्जी
खाज सुटणे, घसा खवखवणे, डोळे पाणी येणे, नाक वाहणे, रात्री झोप न येणे हीसुद्धा ऍलर्जीची लक्षणे असू शकतात. धूळ, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस याव्यतिरिक्त, काही लोकांना हंगामी ऍलर्जीदेखील होऊ शकते. याची लक्षणे सारखीच असतात.
निर्जलीकरण
हिवाळ्यात तहान खूप कमी लागते. पुरेसे पाणी न प्यायल्यामुळेही सकाळी उठल्यावर झोपेच्या वेळी तोंडात लाळ कमी असते. त्यामुळे शरीरातील आर्द्रतेचे प्रमाण खूपच कमी होते. म्हणून हिवाळ्यात पुरेसे पाणी पिणे आणि शरीर डायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे.
तोंडातून श्वास घेणे
झोपेत बरेच लोक तोंडातून श्वास घेतात. यामुळे घोरणे आणि झोपेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जेव्हा तुम्ही नाकातून श्वास घेता तेव्हा तुमच्या तोंडात आणि घशातील आर्द्रता टिकून राहते, परंतु तोंडाने श्वास घेताना घशातील आणि तोंडातील ओलावा निघून जातो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर घसादुखी, घसा खवखवणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
अॅसिड रिफ्लक्स
पोटात असलेले अॅसिड अन्ननलिकेकडे किंवा घशाच्या दिशेने सरकते तेव्हा अॅसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवते. त्यामुळे छातीत आणि घशात वेदना आणि जळजळ जाणवते.
घसा दुखण्यासाठी घरगुती उपाय
घसा खवखवत असेल तर मधाचा चहा पिऊ शकता. कोमट मीठ-पाण्याच्या गुळण्या करू शकता. बेकिंग सोडा पाण्यात घालूनही गुळण्या करू शकता. कॅमोमाईल चहा पिऊ शकता, पुदिन्याची पाने उकळून त्याचे पाणी पिऊ शकता. मेथीचे पाणी पिणे असे अनेक उपाय करता येऊ शकतात. यामुळे घशाला आराम मिळायला मदत होईल.


























































