
बिहारमधील सारण जिल्ह्यातील छपरा (Chhapra hooch tragedy) येथे विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अत्यवस्थ आहेत. यामुळे बिहारमधील नितीश कुमार सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले असून बुधवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा प्रचंड गाजला. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह (Union minister and BJP leader Giriraj Singh) यांनीही बिहार सरकारवर हल्ला चढवला आहे.
गिरीराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये सध्या दारू देवासारखी झाली आहे. राज्यात सर्वत्र दिसतेय, पण ती कोणाला दिसत नाहीय, असे विधान गिरीराज सिंह यांनी केले आहे.
छपरा जिल्ह्यात घडलेल्या घडनेमुळे विधानभवनामध्ये भाजप आमदारांनी गदारोळ घातला. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रचंड संतापले. विधानभवनात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर नितीश कुमार चिडले व त्यांनी भाजप आमदारांना दारुडे म्हटले. ”काय झालेय? दारुडे झाला आहात तुम्ही?” असे नितीश कुमार आंदोलक आमदारांवर ओरडले.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या संतापावरही गिरीराज सिंह यांनी टिप्पणी केली आहे. नितीश कुमार यांनी 10 वर्षात असे केले नव्हते. परंतु आता घटती लोकप्रियता आणि वाढत्या वयामुळे त्यांना राग येतोय, असे गिरीराज सिंह म्हणाले.




























































