सांगोल्यात 14 लाखांची दारू जप्त; पहाटे तीन वाजता टाकला छापा; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगोला पोलिसांनी पहाटे 3 वाजता टाकलेल्या छाप्यात 14 लाख रुपयांची बेकायदा साठा केलेली देशी दारू जप्त केली आहे. या कारवाईत 210 बॉक्स जप्त करण्यात आले असून तिघांना अटक केली आहे. सांगोला -पंढरपूर रस्त्यावरील गार्डी ते गायगव्हाण जाणाऱया रोडवर पोलिसांनी हा छापा टाकला.

सांगोला पोलीस ठाण्यात अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आलेली आहेत. त्यानुसार पहाटे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना तालुक्यातील गायगव्हाण रोडवर उत्तम भगवान रणदिवे यांच्या घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारूचा साठा केल्याची माहिती मिळाली होती. कटफळ दूरक्षेत्राचे बिट अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, राजू चौगुले, भरमशेट्टी, कुंभार यांच्या पथकाने महुद-पंढरपूर रोडवरील गार्डी ते गायगव्हाण जाणाऱ्या रोडवर उत्तम भगवान रणदिवे यांच्या घराशेजारी असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी तीनजण पत्रा शेडमध्ये काही बॉक्स लावत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना पोलिसांनी अटक केली. शुभम राजेश वाघमारे, किरण साधू खिलारे, रवी अर्जुन खिलारे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 14 लाख 11 हजार 200 रुपये किमतीची दारू असलेले 210 बॉक्स जप्त केले.