
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र सर्वसामान्यांच्या जीवनाची अविभाज्य भाग असलेली ही लोकल घेऊन थेट बाप्पाच भक्तांना भेटायला आले आहेत. घाटकोपरच्या राहुल वरिया या व्यावसायिक डिझायनरने आपल्या घरगुती गणपतीसाठी लोकलचा देखावा तयार केला आहे.
मुंबईची ठळक ओळख म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल. राहुल वरिया याने ‘मुंबई लोकल-लाईफलाईन ऑफ सिटी’ या संकल्पनेवर आधारित देखावा बनवला असून त्यात बाप्पाला प्रतिष्ठापित केले आहे. देखाव्यात घाटकोपर स्थानकाचा फलक, लोकलचा डबा, त्यावरील जाहिराती, हँडल्स, आसनव्यवस्था, खिडक्या, दरवाजे, साखळी अगदी सूचनाफलकही यात आहेत. राहुलच्या या देखाव्याला सोशल मीडियासह सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गुप्ता, नीरव व्यास, मौलिक रावल आणि प्रतीक सोलंकी या चार मित्रांच्या मदतीने सनबोर्ड, स्ट्रॉ आणि कार्डपेपरचा वापर करून 20 दिवसांत त्याने हा देखावा उभा केला आहे. घरात बनवलेला लोकलचा हा देखावा इतका हुबेहुब आहे की, घरातच लोकल अवतरल्याचा भास निर्माण झाला आहे. घाटकोपर पश्चिमेला राहणारा राहुल गेल्या नऊ वर्षांपासून स्वतःच घरी पर्यावरणपूरक शाडूची गणपती बनवत आहे. पेशाने व्यावसायिक डिझायनर असल्यामुळे अनेक गणेशमूर्तींचे स्केचही तो काढतो. या लोकलमध्ये प्रतिष्ठापित झालेल्या बाप्पाला पाहण्यासाठी गणेशभक्तांनीही वरियाच्या घरी रांग लावली आहे.




























































