
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले असून विकेंड लॉकडाऊनमुळे शनिवार-रविवार हे दोन दिवस लोकांना घरातच थांबावे लागणार आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी, रात्रीची संचारबंदी यांसारख्या उपाययोजना केल्यानंतरही रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी यांसारखे कठोर निर्बंध लागू केल्यावरही कोरोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या राज्यातील प्रमुख शहरांबरोबरच अन्य शहरांतदेखील दररोज हजारोच्या घरात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून झपाटय़ाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिक कडक पावले उचलण्याबाबत प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवडे सर्व बंद करून कडक लॉकडाऊन करणे गरजेच आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. येणाऱया तीन-चार दिवसांत त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल.
– विजय वडेट्टीवार मदत व पुनर्वसनमंत्री
कोरोनाची साखळी तोडणे हा लॉकडाऊनचा मुख्य हेतू असतो. जगभरात आपण पाहिले तर 15 दिवस ते तीन आठवडय़ांचा लॉकडाऊन हा गरजेचा असून त्याचे कडक पालन झाले पाहिजे. त्यानंतर त्या कालावधीचा फायदा होतो. जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो तेव्हा तत्काळ लॉकडाऊन जाहीर करणे हा नियम आहे.
– राजेश टोपे आरोग्यमंत्री
टेन्शन कमी
2 लाख 26 हजार डोस मिळणार
सेकंड डोसलाच प्राधान्य
मेसेज आलेल्यांनाच लस मिळणार
मुंबईला 2 लाख 26 हजार कोरोना लसीचे डोस मिळणार आहेत, मात्र हा देण्यात येणारा डोसचा साठाही पुरेसा नाही. त्यामुळे या येणाऱया डोसचा वापर प्राधान्याने सेपंड डोस देण्यासाठी केला जाणार आहे.
ज्यांनी लसीसाठी नोंदणी केली आहे आणि ज्यांना लसीकरणासाठी मेसेज आला आहे अशांनाच डोस दिला जाणार आहे.
नोंदणीशिवाय थेट लस देणे तूर्तास बंद करण्यात आले आहे. लसीचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी पाठपुरावा केला जात होता. या पाठपुराव्याला यश आले असून आज मुंबईला कोव्हिशिल्डचे 1 लाख 80 हजार तर कोव्हॅक्सिनचे 46 हजार 630 डोस असे एपूण 2 लाख 26 हजार डोस पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
लोकल ट्रेनलाही ब्रेक?
मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनला पुन्हा ब्रेकही लागू शकतो. कारण लोकलमध्ये सर्वाधिक वेगाने कोरोना पसरतोय, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. लोकलची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने लोकल प्रवासावर पुन्हा निर्बंध आणण्याचा विचारही सरकारी पातळीवर सुरू आहे.
वृत्तपत्र अत्यावश्यक सेवा, वितरण सुरूच राहणार
लॉकडाऊन काळात वृत्तपत्रे विक्री सुरू राहणार आहे, वृत्तपत्रे घरपोच टाकता येणार आहेत. वृत्तपत्र व्यवसायाला अत्यावश्यक सेवा म्हणून सरकारने घोषित केले आहे.
सोमवारी सकाळी 7 पर्यंत घराबाहेर पडू नका!
कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या रोखण्यासाठी शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कडकडीत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
यामध्ये अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवाच सुरू राहणार आहेत. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱयांवर साथरोग कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
त्यामुळे मुंबईकरांनो, दोन दिवस घरीच रहा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे सुरू
किराणा, भाजीपाल्याची दुकाने, डेअरी, बेकरी, खाद्यपदार्थांची दुकाने
सार्वजनिक वाहतुकीतील ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसेस
रुग्णालय, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, मेडिकल, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मा कंपन्या, मेडिकल आणि हेल्थ सर्व्हिस
हे बंद
खासगी वाहने किंवा खासगी बसेस
वाईन शॉप बंदच पण बारमधून दारूची होम डिलिव्हरी
अत्यावश्यक, आरोग्य सेवेव्यतिरिक्त व्यक्तीला सबळ कारणाशिवाय घराबाहेर फिरता येणार नाही.





























































