
कोल्हापूर जिह्यातील राधानगरी तालुक्यात राधानगरी अभयारण्य आहे. हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य असून ते रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. वन्यजीव आणि वनस्पतींनी समृद्ध अशा या अभयारण्याला आता चित्रमय ओळख मिळाली आहे. मुंबईकर आर्टिस्ट सुनील गरुड याने अभयारण्याचा वैशिष्टय़पूर्ण लोगो साकारला आहे.
चुनाभट्टी येथे राहणारा सुनील गरुड हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. 2006 साली उपयोजित कला विभागात तो पहिला आला होता. त्याला ट्रेकिंगची आवड आहे. अभयारण्यांमध्येही त्याने भटकंती केलेली आहे. व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून त्याने अनेक कंपन्यांचे लोगो तयार केलेत, मात्र राधानगरी अभयारण्याचा प्रोजेक्ट खूप खास असल्याचे सुनीलने दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले. गेल्या आठवडय़ात त्याने साकारलेल्या लोगोचे अनावरण झाले.
राधानगरी अभयारण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, यासाठी लोगो तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी यांनी पुढाकार घेत लोगो स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेसाठी 108 प्रवेशिका आल्या. बोधचिन्हामध्ये राजश्री शाहू महाराज, राधानगरी धरण, रानगवा, शिवगड-रांजणगड आदींचा समावेश व्हावा अशा सूचना होत्या, मात्र निवड झालेल्या अंतिम तीन स्पर्धकांच्या बोधचिन्हांमध्ये यातील सगळ्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे कोल्हापूरवासीय नाराज होते. त्यानंतर सुनीलच्या बोधचिन्हाची निवड झाली. माझे काम सगळ्यांना आवडले होते. विशाल माळी यांनी मला संपर्क साधून काही बदल सूचवले आणि त्यानुसार मी काम केले, असे सुनीलने सांगितले.
काय आहे लोगोमध्ये
लोगोमध्ये राजर्षी शाहू महाराज, गवा, करवंद-अंजणीचे झाड, बिबटय़ा, पक्षी, शेकरू, शिवगड किल्ला, राधानगरी धरण आदींचा समावेश आहे.
शाहू महाराजांच्या हस्ताक्षराचा अभ्यास
लोगोसाठी राजश्री शाहू महाराजांच्या हस्ताक्षरातील लिखाण सुनीलला दाखवण्यात आले. त्या अक्षराच्या वळणांचा अभ्यास करून तशाच पद्धतीने सुनीलने लोगोवर ‘राधानगरी अभयारण्य’ हे शब्द मराठीत साकारले आहेत. तसेच शाहू महाराजांची इंग्रजी स्वाक्षरी बघून त्याप्रमाणे ‘राधानगरी’ हा शब्द इंग्रजीत साकारला आहे.































































