आघाडीमधील नेत्यांनीच मला त्या वेळी पाडले : कर्डीले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मला बबनराव पाचपुते यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्यात आली मात्र, त्यावेळेला राष्ट्रवादी आघाडीतल्याच नेत्यांनी माझा पराभव केला, अशी कबुली भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डीलेयांनी जाहीर सभेत दिली आहे. मंगळवारी महायुतीचा मेळवा नगर येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, आमदार मोनिका राजळे, प्रा.भानुदास बरेड, अभय आगरकर, सुजय विखे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

कर्डीले म्हणाले की, सुजय विखे यांना भाजपात या आम्ही तुम्हाला खासदार करतो असे म्हंटलो होतो. तो शब्द आपण खरा करणार आहोत. त्याच बरोबर देशामध्ये जे पाच उमेदवार मताधिक्यांनी निवडून येतील त्यामध्ये सुजय विखेंचे नाव असेल असे ते म्हणाले. मात्र, 2009 साली मी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून नगर दक्षिण लोकसभा मतदासंघात उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळेला मला बबनराव पाचपुते यांच्या सारख्या असंख्य नेत्यांनी उमेदवारीसाठी आग्रह केला होता. पण याच मतदासंघात मला काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझा पराभव केला आहे.