
जास्त तास काम करणे अनेकांच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे वर्षाला हजारोंच्या संख्येने होणारे मृत्यू चिंतेची बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कामाचे जास्त तास आणि त्यामुळे होणारे मृत्यू यासंदर्भात अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा अभ्यास जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक कामगार संघटनेकडून संयुक्तपणे 2000 ते 2016 या दरम्यान केलेला आहे. या अभ्यासानुसार 2016मध्ये जास्त काम केल्यामुळे सात लाख 45 हजार लोकांचा स्ट्रोक तसेच हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू झाला आहे. 2000च्या तुलनेत ही वाढ 30 टक्के जास्त आहे.
याविषयी अधिक माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेतील पर्यावरण, हवामान बदल आणि आरोग्य विभागाच्या प्रमुख मारिया नेईरा यांनी सांगितले की, आठवडय़ाला 55 किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. कर्मचाऱयांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, यासाठी ही माहिती देत आहोत.
- 194 देशांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार आठवडय़ाला 35 ते 40 तास काम करण्याच्या तुलनेत 55 तास किंवा त्याहून जास्त काम केल्याने स्ट्रोकची शक्यता 35 टक्के तर हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण 17 टक्क्यांनी वाढते.
- हा अभ्यास 2016 सालापर्यंतचा आहे. त्यात कोरोना काळाचा समावेश नाही. कोरोनामुळे घरून काम करणाऱयांचे प्रमाण वाढले असून किमान 9 टक्के लोक जास्त तास काम करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे कोरोनात मृत्यूची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
- सर्वाधिक मृत्यू होणाऱयांमध्ये पुरुषांचे प्रमाण 72 टक्के आहे.


























































