
आत्मचरित्राआड एलसीडी ब्लॉट्सच्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे. हिटलरच्या आत्मचरित्रात लपवून ठेवलेले 80 एलसीडी ब्लॉट्स नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ( एनसीबी) ने जप्त केले. ते ब्लॉट्स डार्क नेटच्या माध्यमातून खरेदी केल्याचे एनसीबी सूत्रांनी सांगितले.
विलेपार्ले येथील एका कुरीअरच्या कार्यालयात ड्रग्जचे पार्सल येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने कुरीअर कंपनीत जाऊन चौकशी केली. तेव्हा एनसीबीने एक कुरीअर उघडले. त्यात कुरीअरमध्ये हिटलरचे आत्मचरित्र होते. त्या आत्मचरित्राच्या आत एलसीडीचे 80 ब्लॉट्स होते. जप्त केलेले ब्लॉट्स हे डार्क नेटच्या माध्यमातून खरेदी केले असून त्याचे पैसे हे बिटकॉइनच्या माध्यमातून दिले असावे असा एनसीबीला संशय आहे. ते ब्लॉट्स हे युरोपियन देशातून आले असावे त्यानुसार एनसीबी याचा तपास करत आहेत. एलसीडी हे घातक ड्रग्ज आहे. त्याचे व्यसन केल्यावर 15 मिनिटांनंतर कडक नशा होते. काही नशेबाज हे एलसीडीची नशा गेल्या जन्मी आपण काय होतो त्याच्या आठवणी जाणून घेण्यासाठी करतात. एखाद्या नशेबाजाने एकदा का एलसीडीचे व्यसन केल्यास त्याला त्याची वारंवार नशा करावीशी वाटते.
दोन पेडलर गजाआड
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने सोमवारी रात्री मुंबईत तीन ठिकाणी कारवाई करून दोन पेडलरला अटक केली. गणेश सखाराम शेरे आणि सिद्धांत अमीन अशी त्या दोघांची नावे आहेत. एनसीबीने कारवाई करून 310 ग्रॅम मारिजुना आणि दीड लाख रुपये जप्त केले आहे. गणेशच्या चौकशीनंतर एनसीबीने मालाड येथे ड्रग्ज तस्कर साहिल शहा ऊर्फ फ्लॅकोच्या घरात छापा टाकला. एनसीबीने फ्लॅकोच्या घरातून काही महागडे ड्रग्ज जप्त केले आहे. फ्लॅको हा दुबईला असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. सिद्धांत आणि गणेश हे दोघे फ्लॅकोच्या सांगण्यावरून ड्रग्जची तस्करी करत असायचे. काही महिन्यांपूर्वी एनसीबीने सुशांत सिंह प्रकरणात अब्बास आणि झैदला अटक केली होती. त्या दोघांच्या चौकशीत फ्लॅकोचे नाव समोर आले. फ्लॅको हा काही ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून बॉलीवूडमधील अभिनेत्यांना ड्रग्ज देत असल्याचे एनसीबी सूत्रांनी सांगितले.






























































