एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडला 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत 531 कोटींचा नफा

एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डींग्ज लिमिटेडने (एलटीएफएच) जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 531 कोटी रुपयांचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) नोंदविला आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने करोत्तर नफ्यात 103 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. एकूण कर्जवाटपात रिटेल कर्जाच्या पोर्टफोलिओचे प्रमाण 82 टक्के गाठताना कंपनीने ‘लक्ष्य 2026’ मिशनमध्ये निश्चित केलेल्या 80 टक्के रिटेल कर्जाच्या उद्दीष्टापेक्षा अधिक उद्दीष्ट साध्य केले आहे. ‘लक्ष्य 2026’ योजनेतील बहुतांश उद्दीष्टे हे तीन वर्ष अगोदरच पुर्ण करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.

कंपनीने वित्तीय वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत आणलेले ग्राहकाभिमुख अ‍ॅप्लिकेशन अर्थात-प्लॅनेट अॅप हे कंपनीच्या ग्राहकांसाठी अतिशय शक्तशाली डिजीटल माध्यम ठरले असून आत्तापर्यंत या अ‍ॅपने 44 लाख डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 11 हजार 193 कोटी रुपयांचे रिटेल कर्जवाटप केले असून त्यात मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 25 टक्के वाढ झाली आहे. रिटेल विभागात विविध प्रकारच्या कर्जातील बळकट वाढीचे पाठबळ मिळाले आहे. रिटेल कर्जाची रक्कम आता 64 हजार 274 कोटी रुपयांवर झेपावली असून 30 जून 2022 अखेरच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात 34 टक्के वाढ झाली आहे.

याशिवाय वार्षिक तुलनेत घाऊक कर्जवाटपामध्ये 65 टक्के इतकी वेगाने कपात म्हणजेच 25 हजार 992 कोटी रुपयांनी कपात करण्यात आली असून ‘लक्ष्य 2026’ चे उद्दीष्ट गाठण्यास गती प्राप्त झाली आहे.