जुन्या नोटांच्या बदल्यात 25 लाख रुपये देण्याचे आमिष; महिलेची फसवणूक

जुन्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम देऊ, असे आमिष दाखवत एका महिलेला काही भामटय़ांनी दोन लाख 81 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना भांडुपमध्ये घडली. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

भांडुपच्या तुलशेत पाडा परिसरात राहणाऱ्या जान्हवी (नाव बदलले) यांच्या मुलाला इन्स्टाग्रामवर जुन्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळेल अशी जाहिरात दिसली. त्याने तत्काळ ही बाब त्याच्या आईला सांगितली. त्याच्या आईकडे 20 आणि पाच रुपयांच्या काही जुन्या नोटा होत्या. त्यामुळे त्यांनी लगेचच संबंधित जाहिरातीवर असलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला.

तेव्हा 20 आणि पाच रुपयांच्या नोटा देऊन 25 हजार रुपये देण्याचे आमिष आरोपींनी महिलेला दाखवले. महिलेने तत्काळ होकार देताच आरोपींनी ऑग्रिमेंट करण्यासाठी महिलेकडे साडेबाराशे रुपयांची मागणी केली. 25 लाख रुपये मिळणार असल्याने महिलेने तत्काळ आरोपींना तेवढी रक्कम ऑनलाइन पाठवली. त्यानंतर विविध कारणे सांगत आरोपींनी महिलेकडून दोन लाख 81 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी महिलेशी संपर्क बंद केला. त्यामुळे महिलेने पुन्हा आरोपींशी संपर्क केला असता भामटय़ांनी महिलेला पुन्हा एक लाख रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले.

मात्र या वेळी आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा पैसे पाठवण्यास नकार दिला. परिणामी आरोपींनी पुन्हा महिलेशी संपर्क बंद केला. त्यानंतर महिलेने भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.