
आयुष्यात जी काही सकारात्मकता आहे, त्यातली 70 टक्के बाबांमुळे आहे, सांगतेय… गीतकार अश्विनी शेंडे.
बाबा आणि मी दर रविवारी वाचनालयात जाऊन पुस्तके घेऊन यायचो. बाबा पुस्तक घेतल्यावर तिथल्या स्टाफशी गप्पा मारत रहायचे आणि मी कंटाळून नुकतेच हातात आलेले पुस्तक वाचायला सुरू करायचे. आम्ही घरी पोहोचून भाजीच्या पिशव्या आईच्या हातात द्यायचो आणि मी जाहीर करायचे, ‘‘झाले माझे पुस्तक वाचून.’’ बाबांना कौतुक आणि आईला संशयमिश्रित आश्चर्य वाटायचे. मग एक मौखिक उलटतपासणी व्हायची. ‘‘काय गोष्ट आहे सांग?’’ आणि मी आख्खी गोष्ट सांगून टाकायचे. तीन-चार वेळा असे झाल्यावर त्यांच्या हे लक्षात आले की, मी खरे बोलतेय. पण इतक्या लवकर वाचून कसे होतेय तेही मी सांगून टाकले (लहानपणी किती खरं बोलतो न आपण). त्यावर दोघांच्या प्रतिक्रिया मात्र एकदम भिन्न होत्या. आईचे प्रॅक्टिकली मत होते की, ‘‘मग जरा धीर धर आणि घरी येऊन वाच म्हणजे रविवारभर पुरेल ते पुस्तक.’’ पण बाबांना असे नाही वाटले. ते आईला म्हणाले, ‘‘उजू, (आईचे माहेरचे नाव) ती एका पुस्तकाचा इतक्या कमी वेळात फडशा पाडते, हीसुद्धा एक प्रकारची भूकच आहे. ती का मारायची.’’ आईच्या मताविरुद्ध जाऊन त्यांनी पुढच्या रविवारी दोन पुस्तकांची वार्षिक वर्गणी भरली.
असे आहेत माझे बाबा…आणि शपथ सांगते, हे ‘आहेत…’ म्हणायला इतके इतके इतके भारी वाटतेय…हा किस्सा घडला तेव्हा बाबा ताठ मानेचे, मानी नजरेचे, तरुण आणि तरतरीत होते. आज बाबा पंचाहत्तरीच्या जवळ पोहोचलेत आणि अजूनही ताठ मानेचे, मानी नजरेचे, तरुण आणि तरतरीत आहेत. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते आपण घ्यावे, ल्यावे, प्यावे, खावे, गावे अशा मतांमुळे. मला वाटते बाबा आजही पॉझिटिव्ह राहिलेत आणि तो वारसा माझ्याकडे आलाय. माझ्याकडे किती तरी सुंदर रविवारच्या सकाळ आहेत मनात जपून ठेवलेल्या, विंटेज. वाचनालयाची फेरी झाली की, आमचा मोर्चा भाजी मार्केटकडे वळायचा. प्रत्येक भाजी घेताना बाबा फार प्रेमाने त्या विक्रेत्याशी त्याच्या भाषेत बोलून भाव करायचे. रंग, रूप, गंध, स्पर्श सगळय़ाशी जवळीक साधायला बाबांनी मला त्या मार्केटमध्ये शिकवले. तिथून आम्ही फुले घ्यायचो, घरी फुलदाणीत ठेवायला. आईच्या बजेटमध्ये ही फुले-बिले बसली नसतील कदाचित. पण बाबा म्हणायचे ‘‘भाज्या शरीरासाठी, फळे बुद्धीसाठी आणि फुले मनासाठी.’’ पुरेसा व्यायाम, चांगले जेवण, वेळेवर आणि भरपूर झोप व उत्तम वाचन यासाठी ते आजही इतके आग्रही आहेत. घरात जितकी वाचायची पुस्तके तितक्याच गाण्यांच्या कॅसेट्स. त्या गाण्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचू नाही दिले कधी. आयुष्यात जी काही पॉझिटिव्हिटी आहे त्यातली 70 टक्के बाबांमुळे आहे.
मला तर वाटते रोज रात्री झोपताना ते जी मलमलची शुभ्र बंडी घालून झोपतात, ती बंडी नाही, तो सुखी माणसाचा सदरा आहे… आणि त्याचे काही तलम धागे मला देऊन ठेवलेत त्यांनी.
संकलन: – निनाद पाटील



























































