यंत्र वकील मांडणार न्यायालयात बाजू; निरपराध्यांची दंडापासून सुटका करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशविदेशात सर्वत्र न्यायालयांत प्रलंबित खटल्यांचे मोठे आव्हान आहे. तंत्रस्नेही नसलेली न्यायालये हेही त्यामागील एक कारण आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने न्यायव्यवस्थेने तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात यंत्र वकील अर्थात रोबोटने हजेरी लावली तर दचकून जाण्याचे कारण नाही. अमेरिकेतील न्यायालयात थेट रोबोट हजेरी लावून पक्षकारांची बाजू मांडणार आहे.

अमेरिकेने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या (एआय) तंत्रज्ञानावर आधारित रोबोट वकील बनवला आहे. हा रोबोट सध्याच्या घडीला ओव्हर स्पीडिंगसंबंधी कायदेशीर सल्ला देणार आहे. जगभरात यापूर्वी चॅट जीपीटीची खूप चर्चा झाली आहे. यादरम्यान रोबोट वकिलाने न्यायालयाच्या पायरीवर पाऊल टाकले आहे. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी जग आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या सुवर्णयुगात प्रवेश करीत असल्याचे प्रतिपादन नुकतेच केले होते. त्याची प्रचीती रोबोट वकिलाच्या एन्ट्रीसाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकारातून आली आहे. रोबोट वकिलाला न्यायालयातील सुनावणीवेळी अॅपल एअरपॉड्सच्या माध्यमातून कनेक्ट केले जाणार आहे. इंटरनेट अॅक्सेस असलेला स्मार्टफोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसला न्यायालयात साधारणपणे परवानगी दिली जात नाही. या अनुषंगाने संपूर्ण खबरदारी घेत रोबोट वकिलाची न्यायालयात हजेरी लावली जाईल, असे रोबोट विकसित करणाऱ्या पंपनीने म्हटले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक प्रलंबित खटल्यांचा वेळीच निपटारा करण्यास मदत होईल तसेच अवाजवी शुल्क आकारणीपासून सर्वसामान्य पक्षकारांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास कायदे क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहेत.

निरपराध्यांची दंडापासून सुटका करणार

न्यायालयात युक्तिवाद करण्याबरोबरच कुठल्याही गुह्यात दंडापासून सुटका कशी होईल, खटल्यात पुरावे कसे सादर करता येतील, विरोधी पक्षकाराच्या आरोपांचे खंडन कशा प्रकारे करता येईल, निष्पाप व्यक्तीला कायद्याच्या कचाटय़ातून कसे सहीसलामत सोडवता येईल याचा मौलिक सल्ला रोबोट वकील देईल, असा विश्वास डुनॉटपेचे सीईओ जोशुआ ब्राऊनर यांनी व्यक्त केला आहे. कायद्याचे कोड व भाषा जवळपास सारखीच आहे. त्यामुळे यात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टेक्नोलॉजीचा वापर केला जाऊ शकतो, असे ब्राऊनर यांनी म्हटले आहे.

  • अमेरिकेतील ‘स्टार्टअप डुनॉटपे’द्वारा हा एआय रोबोट वकील विकसित केला आहे.
  • रोबोट वकिलला स्मार्टफोनच्या मदतीने ऑपरेट केले जाऊ शकते.
  • हा रोबोट वकील पुढील महिन्यापासून अमेरिकेतील न्यायालयाच्या पायऱ्या चढणार आहे. त्याचा कायदेशीर सल्ला आणि युक्तिवाद ऐकण्याची अमेरिकेसह संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे.