
मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले. हेच विस्कळीत झालेले जनजीवन आणि त्यात भरडल्या गेलेल्या नागरिकांची भीषण परिस्थिती यात मांडली आहे. नेहमी ग्लॅमरस भूमिकांमध्ये झळकणारी सई ताम्हणकर या चित्रपटात वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. यात ती स्थलांतरित कामगाराची भूमिका साकारतेय. भूमिकेबाबत सई म्हणाली, ‘माझ्या पात्राचे नाव फुलमती आहे. ती एक स्थलांतरित कामगार आहे, जी आता तिच्या पतीसोबत मुंबईत काम करते. तिच्या पतीचा स्टॉल आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट प्रदेशाच्या कट्टर बोलीमध्ये गेलो नाही, कारण ते मुंबईत खूप दिवसांपासून राहतात, ही एक मिश्रित बोली आहे.’ पुढे ती म्हणाली, ‘भूमिका साकारण्यासाठी मधुर सरांनी खूप छान मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत काम करताना खूप छान वाटले. ते अशा मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत जे नेहमी कलाकारांच्या सूचनांचे स्वागत करतात.’ हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी झी फाईव्हवर प्रदर्शित होणार आहे.