मध्य प्रदेशात कडव्या आव्हानामुळे भाजप विसरली ‘अब की बार, 200 पार’ चा नारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेस आणि भाजपने प्रचारासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मध्य प्रदेशात चौथ्यांदा सत्ता स्थापनेची स्वप्न बघणाऱ्या भाजपला काँग्रेसकडून कडवे आव्हान मिळत आहे. तसेच निवडणूकपूर्व मतदार चाचणीतून जनतेचा विरोधी कौल भाजपच्या लक्षात आला आहे. त्यामुळे धास्तावलेले भाजप नेते ‘अब की बार, 200 पार’ हा आपला नारा विसरल्याचे दिसत आहे. भाजप नेते आता 200 जागांची अपेक्षा न करता राज्यात असलेली सत्ता टिकवण्यासाठी धडपड करत आहेत.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ‘अब की बार, 200 पार’ हा नारा ठरवला होता. राज्यात ठिकठिकाणी भितींवर हाच नारा लिहिण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात भोपाळमध्ये झालेल्या कार्यकर्ता महाकुंभ मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही हाच नारा दिला होता. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आपल्या जन आशीर्वाद यात्रेत हाच नारा देत होते. मात्र, निवडणुका जवळ येऊ लागल्यावर चित्र बदलले. तिकीट वाटपानंतर पक्षात उफाळून आलेली बंडखोरी आणि कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार भाजप नेते धास्तावले आहेत. आता 200 आकडा विसरून फक्त असलेले सत्ता टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अमित शहा यांना या नाऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले ‘ मी आकडेवारीबाबत बोलत नाही. मात्र, राज्यात बहुमताने भाजपचेच सरकार स्थापन होईल’ असे उत्तर त्यांनी दिले. आकड्यांमध्ये काय आहे. आकडे विसरून जा. मात्र, राज्यात भाजपचेच सरकार स्थापन होईल. यात शंका नाही असे उत्तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. तर अनेकांची बोलती बंद करणाऱ्या रवीशंकर प्रसाद यांची बोलती या प्रश्नावर बंद झाली. यावर त्यांनी मौन पाळले.

राज्यातील परिस्थिती बिकट असून जनमत पक्षाच्या विरोधात असल्याचे कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात असलेली सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी मध्य प्रदेशात प्रतिष्ठा पणाला लावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, तुम्ही 200 च्या नाऱ्याबाबत विचारू नका, आम्ही 116 जागांवर समाधान मानायला तयार आहोत. आम्हांला फक्त असलेले सत्ता टिकवायची आहे. राज्यातील बदललेल्या वातावरणामुळे आता भाजपनेही आपली भूमिका बदलली आहे.