
मध्य प्रदेशमध्ये नथुराम गोडसे जयंती साजरी केल्याने हिंदू महासभेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेने नथुराम गोडसेच्या 114व्या जयंतीचं आयोजन केलं होतं. या आयोजनाबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हा कार्यक्रम थांबवला.
हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम दौलतगंज येथे आयोजित केला होता. भररस्त्यात नथुराम गोडसे याचा फोटो सोबत घेऊन कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी निघाले होते. वाटेत पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि तो फोटो झाकून नेण्यास सांगितलं. त्यांनी तो फोटो एका वस्तीत नेला आणि त्याच्यासमोर आरती सुरू करण्यात येणार होती. तत्पूर्वी वस्तीत फळवाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. पण आरती सुरू करण्यापूर्वी पोलिसांनी ती थांबवली आणि हा कार्यक्रम रोखला.
त्यानंतर ते पदाधिकारी गोडसेचा फोटो घेऊन दौलतगंज येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात निघून गेले. या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ सिंह राजावत यांनी टीका केली आहे. कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस सरकार आल्यास हिंदू महासभेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी राजावत यांनी केली आहे. दरम्यान, ग्वाल्हेर पोलिसांनी यापुढे अशा प्रकारचा कोणताही कार्यक्रम करू देणार नसल्याचं म्हटलं आहे.






















































