
“आम्ही भारतात मुस्लिमांची संख्या वाढू देणार नाही. 2 पेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या मुस्लिमांना सरकारी नोकऱ्या, सरकारी जेवण, सरकारी शाळा, हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा, बँकांचे कर्ज अशा सुविधा मिळणार नाहीत. त्यानंतरही त्याने मुलाला जन्म दिल्यास त्याला 10 वर्षे तुरुंगात टाकले जाईल. असा कायदा केला जाईल, असे वादग्रस्त वक्तव आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे.
यासोबतच तोगडिया म्हणाले की, ‘आम्ही हिंदूंना सरकारवर नियंत्रण मिळवून देऊ. देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, डीएम, एसपी, न्यायाधीश आम्ही हिंदूंशिवाय इतर कोणालाही होऊ देणार नाही, अशी घटना दुरुस्ती करून घेऊ. हे सर्व शक्य असल्याचे ते म्हणाले.
मध्यप्रदेशातील नर्मदापुरममध्ये गुरुवारी रात्री उशिरा तोगडिया यांनी हे वक्तव्य केले. हिंदू साथी संमेलनात सहभागी होण्यासाठी ते याठिकाणी आले होते. यावेळी ते म्हणाले की, या परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी हिंदूंसाठी हिंदुस्थानातील समृद्धी सेवा सन्मान, सहयोग संस्काराची व्यवस्था 24 तास उपलब्ध करून दिली जाईल. आमच्या खाजगी कॉल सेंटरला कॉल केल्यानंतर ही मदत सर्व गरजूंपर्यंत त्वरित पोहोचवली जाईल.
कर्नाटकात बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनावरही तोगडिया यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. तोगडिया म्हणाले की, ‘बजरंग दलावर ना कोणी बंदी घालणार आहे, ना ती लादणार आहे. ही कर्नाटकची निवडणूक होती. मतदारांना खूश करण्यासाठी ते आश्वासन देण्यात आलं. त्यामुळे हिंदूंना घाबरण्याचे कारण नाही.
यावेळी रामजन्मभूमीबाबत आम्ही यशस्वी आंदोलन केल्याचे तोगडिया म्हणाले. आता आम्ही हिंदू प्रबोधनाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काम करत आहोत. यासाठी देशभरात एक लाख केंद्रे बांधली जात आहेत, ज्यामध्ये एक कोटी हिंदू सामील होतील. हनुमान चालिसाच्या माध्यमातून आपण सर्वांना जोडून घेऊ. या केंद्रांच्या मदतीने गरीब हिंदू कुटुंबांना मोफत आरोग्य, शिक्षण आणि कायदेशीर मदत दिली जाईल.




























































