भयंकर ! भोपाळमध्ये आठ वर्षाच्या मुलीची हत्या करून मृतदेहावर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। भोपाळ

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये सोमवारी माणूसकीला काळीमा फासणारी भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. एका मजूराने आठ वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. या नराधमाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू प्रसाद (35) असे त्याचे नाव आहे.

विष्णू मजुर असून त्याला दारुचे व्यसन असल्याने पत्नीबरोबर त्याचा वाद होता. ती त्याला कायमची सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे विष्णू आईबरोबर राहत होता. त्याचे घर येण्याजाण्याच्या मार्गावरच असल्याने संबंधित मुलीचे आरोपीच्या दरवाज्यावरून नेहमी येणे जाणे होते. सोमवारीही ती नेहमीप्रमाणे त्याच मार्गाने जात होती. मुलगी घराजवळ येताच आरोपीने तिला घरात खेचले. त्यानंतर तिने आरडाओरडा करू नये म्हणून त्याने एका हाताने तिचे तोंड दाबले आणि दुसऱ्या हाताने तिचा गळा दाबला. यात मुलीचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. पण एवढ्यावर त्या नराधमाचे समाधान झाले नाही. त्याने तिच्या मृतदेहावर बलात्कार केला व मृतदेह पलंगाखाली चादरीत गुंडाळून ठेवला. त्यानंतर तो घराबाहेर आला असता मुलीचे कुटुंबीय तिला शोधत असल्याचे त्याने बघितले. आपण पकडले जाऊ या भीतीने तोही मुलीला शोधण्याच्या बहाण्याने तिच्या घरातल्यांबरोबर गावभर फिरला.

संध्याकाळी अंधार झाल्यावर मात्र त्याने मुलीचा मृतदेह घराजवळील नाल्यात फेकून दिला व तिथून पळ काढला. त्यानंतर इंटरसिटी एक्सप्रेस पकडून तो इंदौरला गेला. त्याने मोबाईलही बंद केला. दरम्यान मुलीच्या घरातल्यांना तिचा मृतदेह नाल्यात सापडल्यानंचर एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी मुलीच्या घरातल्यांना पळवून लावत तक्रार घेण्यास नकार दिला. उलट मुलगी घराबाहेर का गेली? तुम्ही सिनेमा बघत नाहीत का असे प्रश्न विचारून त्यांना हाकलून लावले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी राजकारणी व्यक्तींची भेट घेत मदतीची याचना केली. त्यानंतर पोलिसही सक्रिय झाले. शेजाऱ्यांची चौकशी करताना घटनेच्या दिवसापासून विष्णू गायब असल्याचे अनेकांनी पोलिसांना सांगितले. नंतर पोलिसांनी मोबाईल ट्रेस करत विष्णूला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आपण दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.