
सामना प्रतिनिधी, ठाणे/रायगड
ठाणे, रायगड तसेच पालघर जिल्ह्यातही महाआरतीचा सूर टीपेला पोहोचला. डोंबिवलीतील बाजीप्रभू चौक, पी. अॅण्ड टी. कॉलनी, सागाव, सुभाष रोड, कुंभारखाण पाडा, दीनदयाळ रोड येथील हनुमान मंदिरात आज संध्याकाळी हजारो शिवसैनिकांनी महाआरती केली. जो श्रीराम के साथ.. जनता उसी के साथ.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. कल्याणच्या शिवाजी चौकातील हनुमान मंदिरातदेखील महाआरतीचा निनाद घुमला. टिटवाळा रेल्वे स्टेशनजवळील मारुती मंदिर तसेच गौरीपाडय़ात हनुमान व रामाची आरती करण्यात आली. कसाऱ्यातील श्रीराम सिद्धेश्वर मंदिरही रामनामाच्या गजराने दुमदुमून गेले. ठाण्याच्या जांभळी नाक्यावरील पेढय़ा मारुती मंदिरात असंख्य शिवसैनिकांनी आरती केली.
वासिंदमधील मारुती मंदिरातही शेकडो शिवसैनिकांनी महाआरती केली. शहापूर तालुक्यातील लक्ष्मीनारायण मंदिर, किन्हवली तसेच खर्डीतील गावदेवी मंदिर, डोळखांबमधील गावदेवी मंदिर येथे खड्या आवाजातील आरतीने वातावरण प्रसन्न झाले. पालघर जिह्यातील पाचवली राम मंदिर, तारापूर, मनोर, सफाळे, सातपाटी, चिंचणी, डहाणू येथे महाआरतीने शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण झाला. विरार, नालासोपारा, वसई स्टेशन परिसर, एसटी डेपो, पारनाका, चांदीप नाका आदी सोळा ठिकाणी आज हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शिवसैनिकांनी महाआरती केली. टिटवाळा येथील महागणपती मंदिरात महाआरती झाली.
कर्जत, खोपोली, पेणही दुमदुमले
रायगड जिल्ह्यातदेखील महाआरतीचा निनाद घुमला. कर्जत, खोपोलीतील शिवाजी महाराज चौक, पेणमधील राम मंदिर, अलिबागची ब्राह्मण आळी येथे रामाचा जयजयकार करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारणारच, अशी शपथ यावेळी शिवसैनिकांनी घेतली.
summary-maha aarti performed by hindus at thane raigad palghar


























































