जनसेवेचे बांधुनि कंकण…!

2179
maha-ngo-wari

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

वारीत जाणे सर्वांनाच शक्य होत नाही, निदान वारीला जाणाऱ्यांना मदत करून पुण्य कमवावे, अशा हेतूने अनेक दात्यांचे हात मदतीसाठी पुढे सरसावतात. मात्र, वारीत आलेले हौशे-नवशे-गवशे त्या सुविधांचा लाभ घेत वारीचा मूळ हेतू विसरून आपल्या बॅगा भरून परततात. आणि खरा वारकरी सुविधांपासून उपेक्षित राहतो. हे जाणून घेत शेखर मुंदडा आणि त्यांचे सहकारी सत्पात्री दान करत आहेत आणि `महा एनजीओ’ नामक संस्थेतून केवळ वारकरीच नव्हे, तर जवळपास १५०० कर्तव्यतत्पर सेवाभावी संस्थांना सर्वतोपरी मदत करत आहेत.

‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताहे’ असे म्हणत लाखो वारकरी दरवर्षी आषाढी-कार्तिकीची वारी करतात. कोणी पांडुरंगाचे दर्शन घेऊन परततात, तर कोणी नुसते कळसाचे दर्शन घेऊन! हा आनंद सोहळा शब्दातीत असला, तरी पावसापाण्यात तो प्रवास खडतर असतो. लोक मदतीसाठी फळांचे, वस्त्रांचे, औषधांचे वाटप करतात, परंतु पुणे ते आळंदी एवढ्याच भागात `मदत मोहीम’ राबवली जाते. मात्र, खरी आवश्यकता असते, ती सासवडपासून पंढरपुरापर्यंत! तो प्रवास करताना कोणाच्या चपला झिजतात, कोणाची औषधे संपतात, कोणाला वैद्यकीय सुविधेची गरज असते, तर कोणाला दैनंदिन आवश्यक सुविधांची! खरा वारकरी पुढे होऊन कधीही कोणत्याच वस्तूंची मागणी करत नाही. तो प्रतिकुल परिस्थितीशी जुळवून घेत आपले वारीचे ध्येय पूर्ण करता़े अशा निष्काम वारकऱ्यांना सेवा पुरवता यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा अशा वारकऱ्यांची सेवा करतात. यंदाच्या वारीत त्यांनी वारकऱ्यांना वहाणा, पत्रावळी, औषधं, रेनकोट, खाद्यपदार्थ पुरवले आहेत.

शेखरजी सांगतात, `मी गेली १८ वर्षे श्री श्री रविशंकरजींच्या `आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेत काम करतो. देशभर सामाजिक सेवा करणाऱ्या ह्या संस्थेचा मी महाराष्ट्र प्रमुख म्हणून पदभार सांभाळत आहे. ते काम करत असतानाच माझी असंख्य सेवाभावी लोकांशी, संस्थांशी ओळख झाली. ह्या सर्व संस्था आपापल्या स्तरावर प्रामाणिकपणे काम करत असल्याचे मला आढळून आले. परंतु, त्यांच्यापैकी अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे, अपुऱ्या मार्गदर्शनामुळे, कायदेशीर तरतुदींची माहिती नसल्यामुळे अडथळे येत होते. त्यांच्या अडचणी लक्षात घेता, ह्या सर्व संस्थांची मोट बांधायची मी ठरवली. आणि दोन वर्षांपूर्वी १५०० छोट्या सेवाभावी संस्थांना घेऊन `महा एनजीओ’ स्थापन केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या संस्थेचे कार्यकर्तेही अनेक आहेत. तसेच १७ जिल्ह्यांत प्रत्येकी १० जणांची टिम करून जिल्हास्तरीय समिती स्थापन केली. ह्या सर्व कार्यकत्र्यांमार्फत आम्ही सत्कार्य करणाऱ्यांना लोकांना, संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करतो. त्याचाच एक भाग म्हणजे `मदत वारी!’ `लोकांची गरज ओळखून त्यांना मदत पुरवणे’, हे आमचे काम आहे. ह्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. ह्या कामात आम्ही स्वत: झोकून देऊन काम करतोच, शिवाय इतरांनाही दुसNयांच्या मदतीसाठी उद्युक्त करतो. म्हणून आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्यच मुळात आहे, `जाणीव झाली, आता बदल घडवूया!’ (संपर्क : ८४४६००४५८०/९८५०२७०५६८)

शेखरजींच्या महा एनजीओकडून दर महिन्याला किमान १० छोट्या एनजीओला किंवा सेवाभावी लोकांना दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. मात्र, तसे करण्याआधी एनजीओच्या कामाची पूर्णपणे पडताळणी केली जाते. कारण, सद्यस्थितीत सेवाभावी संस्थांच्या नावे अनेक संस्था केवळ कागदोपत्री असतात आणि निधी गोळा करतात. पैसा कमवणे, एवढाच त्यांचा हेतू असतो. त्यामुळे जनतेकडून आलेला पैसा वाया जाऊ नये, म्हणून एनजीओची पूर्ण माहिती काढून मगच कारवाई केली जाते. चांगल्या लोकांना संस्थेशी जोडून नवनवे प्रकल्प राबवले जातात. जसे की `दुष्काळी छावणी कीर्तन!’ ही ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, ह्यांची संकल्पना महा एनजीओच्या सहाय्याने राबवता आली. दुष्काळग्रस्त लोकांना कीर्तनातून मानसिक आणि आर्थिक दिलासा देण्यात आला. (ह्याबद्दल सविस्तर माहिती ७ जुलैच्या अंकात दिलीr आहे.) तसेच यंदा वारीतही पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि निसर्गाचा समतोल बिघडू नये म्हणून जेवणासाठी ३०.००० च्यावर पत्रावळी वाटण्यात आल्या. औषधोपचार पुरवण्यात आले, तसेच २५० वारकऱ्यांना वहाणा देण्यात आल्या.

संस्थांच्या मदतीसाठी निधी कसा उभारला जातो, ह्याबाबत विचारले असता शेखरजी सांगतात, `माझ्याकडे दात्यांची भली मोठी यादी आहे. समाजात अशी अनेक चांगली मंडळी आहेत जी मदतीसाठी तत्पर आहेत. परंतु, त्यांना आपली मदत गरजवंतांपर्यंत पोहोचेल की नाही, ह्याची शाश्वती नसते. मी सुरुवातीपासून समाजकार्यात सक्रिय असल्याने लोक माझे काम पाहत होते. त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला आणि त्यांनी मदतीची इच्छा व्यक्त केली. अशा लोकांची यादी मी तयार केली आणि गरजू संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत पुरवण्यास सुरुवात केली. सुदैवाने आमच्याकडे पुष्कळ दाते आहेत, गरजू माणसे आहेत, नवनवीन प्रोजक्ट आहेत आणि सर्व कारभार पारदर्शकपणे चालवण्यासाठी दोन लेखापालदेखील आहेत. ह्या सर्वांच्या मदतीमुळे सर्व यंत्रणा सुरळीतपणे सुरू आहे.’

महा एनजीओप्रमाणेच श्री श्री रविशंकर ह्यांच्या `आर्ट ऑफ लिव्हिंग’चे स्वयंसेवकदेखील वारीत सहभागी होतात. मोठ्या प्रमाणावर निघणाऱ्या वारीमुळे आणि वारकऱ्यांमुळे प्रदूषण होऊ नये, कचरा साठू नये म्हणून `आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या स्वयंसेवकांची तुकडी स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी कटिबद्ध होते. यंदाही वारी झाली, वारकरी परतले की ६०० ते ७०० स्वयंसेवक पंढरपूर परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी घेणार आहेत. पालिकेवर, प्रशासनावर भार न पडता, स्वच्छता मोहिमेत आपलाही हातभार लागावा, हा त्यामागचा हेतू असतो, असे शेखरजी सांगतात.

महा एनजीओतर्फे यंदा `वारकरी सेवा रथ’ वारीतून फिरवला जात आहे. श्रमदान, समयदान किंवा एक दिवस सेवा रथासोबत चालून आपणही सहकार्य करू शकता, असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले होते. जेणेकरून वारकऱ्यांना आरोग्य सेवा, औषध, शुद्ध जल उपलब्धता, रेनकोट, छत्रीवाटप, चप्पल-बूट वाटप, मोबाईल चार्जिंग सुविधा, प्रवासातील इतर गरजू वस्तू व सेवांचे वाटप करता येईल.

जनसेवेचे कंकण बांधून सुरू केलेला प्रवास शेखरजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वारीचे पुण्य मिळवून देणारा आहे. दुसऱ्यांची गरज आणि दु:ख जाणून पुढे केलेला मदतीचा हात, हेच खरे `आर्ट ऑफ लिव्हिंग’चे मर्म असावे काय?

आपली प्रतिक्रिया द्या