
धक्कातंत्राचा वापर करून महाबळेश्वर पालिकेने रे गार्डन परिसरातील गाळ्यांसमोरील ओटय़ांचे पक्के बांधकाम जेसीबीच्या मदतीने उद्धवस्त केले. पालिकेच्या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
बसस्थानकासमोर पालिकेचे रे गार्डन शॉपिंग सेंटर आहे. यातील काही दुकानदारांनी दुकानांसमोर रस्त्यांवर अतिक्रमण करून पक्के ओटे बांधले होते. त्यामुळे दुकानासमोर सहा ते सात फूट अतिक्रमण होत होते. या अतिक्रमणाविरोधात अनेक तक्रारी केल्या जात होत्या; परंतु आजवर कारवाई केली जात नव्हती. पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी या अतिमक्रणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन ते काढण्याच्या सूचना वारंवार केल्या होत्या. या सूचनांकडे दुकानदारांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आज धक्कातत्रांचा वापर करून पालिकेच्या मुख्याधिकाऱयांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.
मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी आदेश देताच करनिरीक्षक भक्ती जाधव यांनी सूरज किर्दत व अरुण वायदंडे या अधिकाऱयांना सोबत घेऊन कारवाईची मोहीम सुरू केली. आज सकाळी जेसीबी घेऊनच हे पथक रे गार्डन शॉपिंग सेंटर येथे पोहोचले. त्यांनी दुकानांसमोरील पक्के बांधकामातील ओटे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. टॅक्सी स्टँड येथून सुरू झालेली ही मोहीम आंबेडकर चौकापर्यंत पोहोचली होती.





























































