महानंदच्या लस्सीला आता आंब्याची चव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महानंदच्या लस्सीला आता आंब्याची चव येणार आहे. महानंदच्या ‘बहार’ या साध्या लस्सीला बाजारात मोठी मागणी असून दिवसाला मुंबईत तब्बल चार टनाची विक्री होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महानंदने साध्या लस्सीबरोबरच मँगो फ्लेवरची लस्सी आणि मसाला दूध आणण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढत्या स्पर्धेमुळे महानंदच्या दुधाची विक्री दोन लाख लिटरपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी डेअरीने मसाले दुधाबरोबरच दही, ताक, लस्सी, तूप या सह उत्पादनांची विक्री वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या डेअरीच्या दीड टन मसाले दूध, 1 टन तूप आणि चार टन लस्सीची दररोज विक्री होत आहे. या सहउत्पादनांच्या विक्रीतून डेअरीने वर्षभरात 28 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला होता. त्यामध्ये वाढ करण्यसाठी मँगो फ्लेवरची लस्सी, बटर, चॉकलेट आणि मँगो फ्लेवरचे मसाला दुधाचे उत्पादन सुरू केली जाणार आहेत. 200 मिलीच्या पाऊचमध्ये ही उत्पादने उपलब्ध असणार आहेत. या नव्या उत्पादनांमुळे दुधाची विक्री कमी झाल्याने डेअरीवर वाढलेला कर्मचाऱ्यांच्या पगाराचा भार कमी होणार असल्याचे डेअरीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

रेशन दुकानांमध्ये केवळ 700 किलोची विक्री
महानंद डेअरीचा व्यवसाय वाढावा म्हणून सरकारने मुंबईतील रेशन दुकानांमध्ये दही, ताक, लस्सी, तूप, मसाले दूध ही सहउत्पादने विक्रीस ठेवण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत साडेतीन हजार रेशनिंग दुकाने असूनही केवळ साडेतीनशे दुकानांमधून सहउत्पादनांची विक्री होत आहे. त्यांच्याकडे दुग्ध पदार्थ ठेवण्यासाठी फ्रीज नसल्याने अनेक दुकानदार ही उत्पादने ठेवण्यास उत्सुक नाहीत.

summary- mahanand added mango flavor in its lassi