
महानंद डेअरीच्या कर्मचाऱयांची दिवाळी यंदा कडू होणार आहे. डेअरीतील अधिकारी-कर्मचाऱयांचा पगार महिन्याच्या 1 आणि 7 तारखेला होतो, मात्र पगाराची तारीख उलटून गेली तरी अद्याप सप्टेंबर महिन्याचा पगार झालेला नाही. त्यामुळे पगार कधी होणार अशी विचारणा प्रशासनाकडे अधिकारी-कर्मचारी वारंवार करत आहेत, मात्र सध्या डेअरीकडे पैसेच नाहीत. त्यामुळे पगार कधी होईल हे सांगता येणार नाही, असे उत्तर संबंधित अधिकाऱयांकडून दिले जात आहे.
राज्यातील सहकारी दूध संघाची शिखर संस्था म्हणून महानंद डेअरीची ओळख आहे. सभासद संघांकडून संकलित केलेल्या दुधावर प्रक्रिया, पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते. त्यासाठी सध्या डेअरीत 900 अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षानुवर्षे त्यांचे पगार दर महिन्याच्या निश्चित तारखेला न चुकता केला जात होता. मात्र सध्या दुधाच्या विक्रीत मोठी घट झाल्याने डेअरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने डेअरीसाठी तब्बल 70 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी सरकारने तत्काळ 30 कोटी रुपयांचा निधी डेअरीला सुपूर्द केला होता, मात्र उर्वरित 40 कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत नव्याने सत्तेत आलेल्या ‘ईडी’ सरकारने देण्याबाबत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे डेअरी आर्थिक अडचणीत आली असून गेल्या तीन महिन्यांपासून पॉलिथिन, बॉक्ससह इतर माल पुरवणाऱया पुरवठादारांची सुमारे 15 कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी डेअरीकडे साडेचार कोटी रुपये नाहीत. त्यामुळेच कर्मचाऱयांचा पगार होऊ शकलेला नसल्यामुळे त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे.
























































