महाराष्ट्रात 105 लाख टन साखरेचे उत्पादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दि. 30 एप्रिलपर्यंत देशातील 531 साखर कारखान्यांत 320.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगाम अखेरपर्यंत देशात 327.35 लाख टन साखरनिर्मिती होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने व्यक्त केला आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तामीळनाडू या पाच राज्यांनी आघाडी मारली असून, त्या खालोखाल हरियाणा, पंजाब आणि बिहारचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 105.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

देशातील 531 साखर कारखान्यांपैकी 67 कारखान्यांत अजूनही ऊसगाळप गळीत (30 एप्रिलपर्यंत) सुरू होते. उत्तर प्रदेशात 101.90 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, कर्नाटकात 55.50 लाख टन, तर तामीळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे 10.95 लाख टन व 10.10 लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरियाणा (7.15 लाख टन), पंजाब (6.65 लाख टन) आणि बिहार (6.40 लाख टन) या राज्यांत साखर उत्पादनाला गती मिळाली आहे.

या राज्यांशिवाय मध्य प्रदेश (5 लाख टन), उत्तराखंड (4.75 लाख टन), तेलंगणा (2.80 लाख टन), आंध्र प्रदेश (2.30 लाख टन) व उर्वरित राज्यात 1.50 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरात (10.80 टक्के ) मध्ये असून, त्यानंतर कर्नाटक (10.10 टक्के), तेलंगणा (10.10 टक्के), महाराष्ट्र (10 टक्के), आंध्र प्रदेश (9.70 टक्के), बिहार (9.70 टक्के) व उत्तर प्रदेश (9.65 टक्के) या राज्यांचा क्रमांक आहे. उसाचे सर्वाधिक गळीत उत्तर प्रदेशात (1055.96 लाख टन) झाले असून, त्यानंतर महाराष्ट्र (1053 लाख टन) व कर्नाटकाचा (549.50 लाख टन) क्रमांक आहे. सध्याच्या गाळपाचा वेग लक्षात घेता, देशातील गाळप हंगाम जेमतेम मे महिनाअखेरपर्यंत चालेल व त्यातून सुमारे 327 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त सुमारे 45 लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनात वळवला जाईल असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले आहे.