
राज्यात नगर जिल्ह्यात जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2021 या काळात 60 तर सोलापूर जिल्ह्यात याच कालावधीत 90 बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
राज्यातील बाल विवाहांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या संदर्भात अतुल भातखळकर व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला अॅड. यशोमती ठाकूर यांनी लेखी उत्तर दिले.नगर, सोलापूर जिल्ह्यात विवाहाच्या वेळेस मुलीचे वय वाढीव दाखवल्यामुळे बाल विवाहाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले नाही.
राज्यात बाल विवाह रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी सरकारी, निमसरकारी, खासगी, सहकारी संस्था व कार्यालयांमध्ये महिला तक्रार समितीची स्थापना करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिला व बाल कल्याण विभागामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. शासकीय महिला वसतीगृहे तसेच महिला संरक्षण गृहे आणि स्वयंसेवी आधारगृहे स्थापन करण्यात आली आहेत. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन दिले जाते. महिला मंडळाने सहाय्यक अनदानाअतंर्गत महिला प्रशिक्षण केंद्राना सहय्यक अनुदान दिले जाते असे उत्तरात नमूद केले आहे.





























































