4 टक्के स्वतंत्र आरक्षण द्या, समस्त ब्राम्हण समाजाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील ब्राह्मण समाज हा सरकारच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सवर्णांना 10 टक्के आरक्षणावर खूश नसून त्यांनी ब्राह्मणांसाठी वेगळ्या 4 टक्क्याच्या आरक्षणाची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील ब्राह्मण समजातील 24 गटांचा मिळून तयार करण्यात आलेल्या समस्त ब्राह्मण समाज या संस्थेने नुकतेच आझाद मैदान येथे आरक्षणासाठी आंदोलन केले. सरकारने उच्च वर्णीयांसाठी लागू केलेल्या 10 टक्के आरक्षणाअंतर्गत तब्बल 250 जाती येतात. या 250 जातींमध्ये हे आरक्षण विभागले तर प्रत्येक जातीच्या वाटेला फारच कमी आरक्षण येईल. त्यामुळे ब्राह्मण समाजाने सरसकट 4 टक्के आरक्षणाची मागणी केली आहे.

‘महाराष्ट्राच्या एकूण 11.4 कोटी लोकसंख्येच्या 8 टक्के लोकसंख्या ही ब्राह्मणांची आहे. आणि त्या 8 टक्के लोकांसाठी आ्म्ही 4 टक्के आरक्षणाची मागणी करत आहोत. ब्राह्मण समाजात असलेल्या गरीब लोकांना पुढे येण्यासाठी संधी मिळाल्या पाहिजेत’, असे समस्त ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी हरयाणा सरकार ब्राह्मण समाज कल्याण बोर्ड स्थापण करणार असल्याचे देखील सांगितले. त्या धरतीवर महाराष्ट्र सरकारने देखील ब्राह्मण समाजासाठी एक बोर्ड स्थापन करावे असे सांगितले.