मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या खोटारडेपणाचा कळस

रुग्णांच्या मृत्यूवरही राज्य सरकारकडून मिंधेगिरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या खोटारडेपणाने आज कळस केला. रुग्णालयात औषधी तसेच डॉक्टर्स आणि कर्मचाऱयांचा कोणताही तुटवडा नव्हता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छातीठोकपणे सांगितले. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी औषधांचा तुटवडा, अपुरा कर्मचारी वर्ग या मृत्यूला कारणीभूत असल्याचे सांगितले. दरम्यान, औषधांअभावी मृत्यू होणे गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आरोग्य व्यवस्थेला काळिमा 

नांदेड येथील रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात 2 नवजात बालकांसह 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणारी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. कालची घटना ताजी असतानादेखील प्रशासनाला जाग आली नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 केंद्राकडून दखल; सविस्तर अहवाल मागवला

नांदेडसह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. रुग्णांच्या मृत्यूबाबत रुग्णालय प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल आणि राज्यातील शासकीय रुग्णालयांना केंद्र सरकारकडून मदतही देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितले. नेमके कोणते रुग्ण होते, कधी अॅडमिट झाले होते ही सर्व माहिती मागविण्यात आली आहे. सुविधांचा अभाव दिसून आला तर संबंधित वैद्यकीय महाविद्यालयावर एमसीआयच्या माध्यमातून तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिले.

भाजपच्या नजरेत गरीबांच्या जीवाला काहीच किंमत नाही! राहुल गांधी यांचा संताप

नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील अनागोंदीचे बळी ठरलेल्या 24 रुग्णांबद्दल शोक व्यक्त करत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. ‘औषधांअभावी 12 अर्भकांसह 24 जणांचे मृत्यू व्हावेत ही बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. जाहिरातबाजीवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱया भाजप सरकारकडे मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपाच्या नजरेत गरीबांच्या जीवाला काहीच किंमत नाही,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

बदल्यांचा खेळ

हाफकीनने थांबवलेला औषधांचा पुरवठा, सर्वच विभागातील निष्णात डॉक्टरांच्या अचानक करण्यात आलेल्या बदल्या, अपुरा कर्मचारी वर्ग, निवासी डॉक्टरांच्या समस्या या सर्वांचा  एकत्रित परिणाम होऊन 18 रुग्णांचा घाटीत बळी गेल्याचा आरोप होत आहे. घाटीच्या खासगीकरणाचे दिवास्वप्न पाहणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टरांच्या बदल्यांचा खेळ चालवला आहे.

500 खाटा, 1200 रुग्ण

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृतांचा आकडा 35 वर पोहचला असून आणखी 70 रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णालयात 500 खाटांची व्यवस्था आहे. पण 1200 पेक्षा अधिक रुग्ण तिथे उपचार घेत आहेत. रुग्णांच्या तुलनेत उपचार करण्यासाठी डॉक्टर्स व अन्य कर्मचाऱयांची अपुरी संख्या आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

रुग्णालयांतील मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आरोग्यमंत्री कोटय़वधी रुपयांच्या जाहिराती देत आहेत, आरोग्य खात्याची हजारो कोटींची टेंडरे काढण्यात येत आहेत. इकडे औषधांच्या तुटवडय़ामुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. त्यामुळे टेंडर काढलेली कामे होत नाहीत हे स्पष्ट आहे. मग टेंडरचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे मलिद्यासाठी शासकीय रुग्णालयांचे स्मशान करणारे ‘हत्यारे सरकार’ असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.