
कोरोनाच्या तिसऱया लाटेआधीच लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सध्या प्रमाण जरी कमी असले तरी अगदी तान्हुल्यापासून ते 18 वर्षांच्या मुलापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालकांच्या नकळत मुलांना कोरोनाची लागण होत असून दुर्लक्ष झाल्याने त्यांच्यामध्ये मल्टिसिस्टीम इन्फलमेटरी सिंड्रोमची लागण होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांमधील लक्षणांवर लक्ष ठेवून योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होईल असे अंदाज बांधले जात आहेत. मात्र त्याआधी सध्या सुरू असलेल्या दुसऱया लाटेतच लहान मुलांना कोरोनाने ग्रासले आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांत कोरोनाग्रस्त मुलांवर उपचार करण्यात येत आहेत. लहान मुलांमधील लक्षणे वेळीच ओळखा असा सल्ला तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
90 टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये सौम्य लक्षणे
लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण आढळून येत असले तरी यातील 90 टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. पाच टक्के मुलांमध्ये सर्दी, खोकला, थोडा ताप, उलटी, पोट दुखणं अशी लक्षणे आढळू शकतात. तर एक ते दोन टक्के मुलांची प्रकृती कोरोनामुळे गंभीर झाल्याचे आढळून आले आहे. मात्र या एक ते दोन टक्के मुलांमध्ये एमआयएसची लक्षणे आढळून आली असून यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते, असे बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांनी सांगितले आहे.
कशावर होतो परिणाम
हृदय, फुफ्फुसं, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा, पोटातील आतडी या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो.
उपचार मुलांमध्ये तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक ताप आढळल्यास तत्काळ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्या आवश्यक त्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. जर साधा कोरोना असेल तर पीएचसीमध्ये दाखल करणे अन्यथा ज्या रुग्णालयांत पीआयसीयू आहेत अशा रुग्णालयात तातडीने उपचार करण्याची आवश्यकता आहे.
कशामुळे होतेय लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण
लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण ही मुख्यतः त्यांच्या पालकांकडून होण्याची दाट शक्यता असते. बऱयाचदा मुलांना कोरोना होऊन गेला हे पालकांना कळतसुद्धा नाही. त्यामुळे पालकांना जरा जरी संशय आला किंवा पालक तसेच घरामध्ये अन्य कोणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर मुलांची चाचणी करून घेणे केव्हाही महत्त्वाचे आहे, असा सल्ला केईएम रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. मुकेश अगरवाल यांनी दिला आहे.
कशामुळे होतो एमआयएससी
मल्टिसिस्टम इन्फ्लामेटरी सिंड्रोम लहान मुलांमध्ये दिसून येऊ शकतो. कोरोनानंतरच्या काही महिन्यांमध्ये एमआयएससीची होऊ शकते. त्याचप्रमाणे अगदी लहान मुलांमध्ये कोविड पॉझिटिव्ह आईकडून एमआयएसएन होऊ शकतो. संक्रमण झाल्यावर काही आठवडय़ांनी कधी कधी तर 2-3 महिन्यांनंतरही होऊ शकतो असे डॉ. सुहास प्रभू यांनी सांगितले.
कोरोनाच्या चाचणीत हयगय नको
लहान मुलांमध्येही मास्कचा वापर, हात वेळोवेळी धुणे या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांना कोरोनाची लागण झाली तरी न घाबरता डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा. कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष करू नका. सर्दी, खोकला, ताप असेल तर कोरोना चाचणी करण्यात हयगय करू नका, असा सल्ला नानावटी रुग्णालयाचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. तुषार मणियार यांनी दिला.
कोरोनाचा मुलांना धोका किती
- 90 ते 95 टक्के मुलांत अत्यंत सौम्य लक्षणे आढळतात व ही मुले कोरोनातून एक आठवडय़ात बरी होतात
- पाच टक्के मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप, जुलाब, चीचचीड यासारखी लक्षणे आढळतात, मात्र ते लवकर बरे होतोत
- 1 ते 2 टक्के मुलांना मोठय़ा माणसांतील न्युमोनियासार तसेच एमआयएससीसारखे गंभीर परिणाम होतात.
लहान मुले संसर्गाचे वाहक ठरू शकतात
90 ते 95 टक्के मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत नाहीत. तरी पालकांमधील तीव्र लक्षणांमुळे त्यांना संसर्गाचा धोका असतो. आणि हीच मुले संसर्गाचे वाहक ठरू शकतात असा इशारा मदरहूड रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. सुरेश बिराजदार यांनी दिला.
ही दक्षता घ्या
मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना फिवर क्लिनिक किंवा फॅमिली डॉक्टरकडे न्या अथवा फोनवर सल्ला घ्या.
रॅपिड अॅण्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक
लक्षणे आढळल्यास मुलांना विलगीकरणात ठेवा, विलगीकरणात आई किंवा वडील यापैकी एकाने मुलासोबत राहा. त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. कोरोनाग्रस्त मुलांना आजी-आजोबांपासून लांब ठेवा
मुलांचा श्वास वेगाने होतोय का, ताप 102 पेक्षा अधिक आहे का, तीन ते चार दिवस सतत ताप आहे का, लघवीचे
प्रमाण, ऑक्सिजनचे प्रमाण याची दररोज चाचणी करा
ताप उतरत नसल्यास दम, चीडचीड किंवा मूल निपचीत असल्यास त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसीयूची व्यवस्था असलेल्या लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल करा.
सामान्य लक्षणं
- ताप, कोरडा खोकला, घसा खवखवणं, धाप लागणं, तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं
- काळजी करण्यासारखी लक्षणं
- पोट बिघडणं, उलटय़ा होणं, डोकेदुखी, बेशुद्ध पडणं, सतत चिडचिड करणं, त्रागा करणं, अंगावर पुरळ येणं, डोळे
- लाल होणं, हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं.






























































