हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनच्या १४ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहा जण बिनविरोध,  ३ जुलै रोजी मतमोजणी

सामना प्रतिनिधी, नांदेड
महाराष्ट्र राज्य को-ऑप.हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड मुंबईच्या १४ संचालकांच्या जागांसाठी आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिकठिकाणी मतदान घेण्यात आले. या मतदानाची मतमोजणी ३ जुलै रोजी अभ्युदय सहकारी बँकेच्या सभागृहात काळा चौकी मुंबई येथे सकाळी ९ वाजता होणार असून, दुपारपर्यंत निकाल हाती येतील.

महाराष्ट्र राज्य को-ऑप.हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड मुंबईच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. घटनेतील सुधारणानुसार यापूर्वी असलेल्या ४७ जागा या २१ जागांवर आल्या. त्यापैकी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सात संचालक बिनविरोध निवडून आले. यात भटक्या विमुक्त मतदारसंघातून पूर्वीचेच संचालक विजय पाटील, पुणे विभागातून माजी अध्यक्ष व्ही.बी.पाटील, सागर काकडे, अ‍ॅड. ललित चव्हाण हे बिनविरोध निवडून आले. तसेच नाशिक विभागातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश पाटील, आमदार सानप व आमदार वसंत गिते हे बिनविरोध निवडून आले. सर्वसाधारण मतदार संघ मुंबई विभागातून दोन जागांसाठी सिताराम राणे, शिवाजीराव शिंदे, दत्तात्रय वडेर हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर मराठवाडा विभागातून आठ जिल्ह्यातून ११ उमेदवार रिंगणात होते तर त्यातून संभाजीनगरचे प्रकाश झांबड व संतोष बोबडे यांनी माघार घेतल्याने चार जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात विद्यमान संचालक हरिहर भोसीकर, माजी संचालक गंगाधर पटणे, विजय गंभिरे हे तिघे नांदेडचे तर परभणीचे रविंद्र देशमुख, लातूरचे भानुदास डोके, संभाजीनगरचे सुनील जाधव, गेवराईचे जयसिंह पंडीत, हिंगोलीचे दिलीप चव्हाण आणि जालनाचे संजय टोपे असे ११ उमेदवार रिंगणात आहेत. मराठवाडा विभागातून चार जागा आहेत. तर राखीव जागांसाठी अनुसूचित जाती, जमातीसाठी असलेल्या दोन जागांसाठी बालाजी औटे, उत्तमराव शिंदे आणि निशा सोनवणे हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय मतदारसंघातील एका जागेसाठी घुई खेडकर, वसंतराव तोरणे हे उमेदवार रिंगणात आहेत.

महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांसाठी स्नेहा आम्रे, शैलेजा लोटके, जयश्री पाटील आणि सिसोदे संजीवनी असे चार उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वसाधारण मतदार संघात नागपूर विभागासाठी दोन जागांसाठी चार उमेदवार तर सर्वसाधारण मतदारसंघ अमरावती विभागातून दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १४ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात असून, आज प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात यासाठी मतदान झाले. मराठवाड्यात नांदेड येथे ४८ तर संभाजीनगर येथे ४० मतदार आहेत. या निवडणुकीचा निकाल ३ जुलै रोजी अभ्युदय सहकारी बँकेच्या सभागृहात होणार्‍या मतमोजणीनंतर जाहीर केला जाईल. आज या निवडणुकीसाठी सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.