
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव देशभरात हळूहळू कमी होऊ लागला आहे. महाराष्ट्र कोरोनाची दुसरी लाट गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात येताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत 23.55 टक्के घट झाली असून रुग्ण दुपटीचा कालावधी 205 दिवसांवर पोहचला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या कडक उपाययोजनांमुळे मागील काही दिवसांत नव्याने आढळणाऱया रुग्णसंख्येतही झपाटय़ाने घट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. 3 जून रोजी राज्यात 2 लाख 4 हजार 974 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक जवळपास 10 हजारांची घट होताना दिसत आहे.
महाराष्ट्र कोरोनाची पहिल्या लाट सप्टेंबरला आली यावेळी 23 सप्टेंबरला एका दिवसात 21 हजार 29 रुग्ण आढळले होते. तर दुसरी एप्रिलमध्ये आली. यामध्ये 22 एप्रिलला एका दिवसात 67 हजार 13 नवीन रुग्ण आढळले, मात्र गेल्या काही दिवसांत नव्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याचे आरोग्य विभागाकडील आकडेवारीवरून दिसून येते.
रिकव्हरी रेट 94.73 टक्के
राज्यात आजपर्यंत 54 लाख 86 हजार 206 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 94.74 टक्के एवढे झाले आहे.
प्रमुख जिल्ह्यांतील अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबई 18245
ठाणे 16740
नाशिक 6194
पुणे 26443
संभाजीनगर 3585
नागपूर 9719





























































