राज्यातील पूरग्रस्तांना एमआयडीसीकडून भरीव मदत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 25 हजार पूरग्रस्त कुटुंबीयांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला.

महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. यामध्ये रेशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ आदींचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे. ज्या गावांना एमआयडीसीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

एमआयडीसीच्या राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयांतून ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठविण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, संभाजीनगर, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून 25 हजार किलो वजनाची एक हजार रेशनची पाकिटे, 2 हजार पाण्याच्या बाटल्या, 5 हजार 500 ब्लँकेट्स, 5 हजार 500 टॉवेल्स पाठविण्यात आले तर संभाजीनगर येथून 500 अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली.

n कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रावर पुरामुळे मोठे संकट कोसळले आहे. येथील सुमारे 25 हजार कुटुंबीयांना एमआयडीसीच्या वतीने मदत दिली जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केले जाणार आहे. शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याची भावना सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.