
राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी साहसी पर्यटन धोरण अमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. त्यामुळे राज्यात पर्यटकांना बलून सफारी, पॅरामोटरिंग, स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवता येईल. आकाशाला गवसणी घालताना वॉटरस्पोर्ट्स, ट्रेकिंगला चालना मिळणार आहे. राज्यात साहसी पर्यटन धोरणाला मान्यता देताना अभयारण्याच्या बाहेरील परिसरातील निसर्गभ्रमणाचाही साहसी पर्यटन धोरणात समावेश केला आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये वन्यजीवांविषयी गोडी अधिक वाढण्यास मदत होईल.
राज्यात जमीन, आकाश व पाण्यातील साहसी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या साहसी पर्यटन धोरणाला अलीकडेच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आता राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने दोन दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे आता या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग खऱया अर्थाने मोकळा झाला आहे. या धोरणासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे.
वन्य जिवांच्या क्षेत्रात प्रवेश नाही
वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहलींचा साहसी पर्यटनामध्ये समावेश करण्यात आला आहे. अभयारण्याच्या बाहेरील परिसराचा निसर्गभ्रमणाचा समावेश साहसी पर्यटनात केला आहे. मात्र वन्य जिवांचा वावर असलेल्या भागात पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही.
गिर्यारोहकांच्या सुरक्षेची काळजी
गिर्यारोहण मोहिमा आयोजित करताना सुरक्षेच्या संदर्भात काही वेळा काळजी घेतली जात नाही. अनुभव नसलेल्या व्यक्ती व संस्थांमार्फत गिर्यारोहण मोहिमा आयोजित होतात. या मोहिमांमध्ये सहभागी होणाऱया गिर्यारोहकांच्या संख्येवरही अनेकदा निर्बंध नसतो. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे नव्या धोरणात सुरक्षाविषयक प्रश्नांचा विचार केला आहे. त्यामुळे सह्याद्रीतील गिर्यारोहण मोहिमा, प्रस्तरारोहण मोहिमांमध्ये अनुभवी व्यक्ती सहभागी होतील आणि अशा मोहिमांमध्ये सहभागी असलेल्यांची संख्या पंधरापेक्षा अधिक नसेल असेही स्पष्ट केले आहे.
25 क्रीडा प्रकारांचा समावेश
साहसी पर्यटनात 25 प्रकारच्या साहसी खेळांचा समावेश केला आहे. त्यात ट्रेकिंग, रॅपलिंग, रॉक क्लायंबिग, रिव्हर क्राँसिंग, बाईकिंग (सायकल) ऑल टेरने व्हेईकल अशा खेळांचा समावेश आहे. जंगलात तंबू टाकून रात्रीच्या वेळेस वास्तव्य करण्यासाठी पँपिंगबरोबरच स्क्युबा डायव्हिंग, स्नाँरकेलिंग, पॅरासेलिंग, जेट स्की, स्पीड बोट, वॉटर स्कूटर, रिव्हर राफ्टिंग अशा पाण्यातील साहसी क्रीडा प्रकारांचाही समावेश आहे.
























































