
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यात 10 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून एकाच दिवशी पाच वर्षांपर्यंतच्या सुमारे 1 कोटी 22 लाख बालकांना पोलिओ डोस देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्याच्या आरोग्य विभागाने आखल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरवर्षी वर्षातून दोन वेळेस पोलिओची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेसाठी राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी, असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची आज आढावा बैठक झाली.
गेल्या वर्षी सुमारे 1 कोटी 20 लाख 98 हजार बालकांना पोलिओ डोस देऊन 99.7 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. या वर्षी 1 कोटी 21 लाख 60 हजार 63 बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे 82 हजार 719 पोलिओ बुथ उभारण्यात येणार असून त्यासाठी 2 लाख 19 हजार 313 एवढे कर्मचारी नियुक्त केले आहेत. 16 हजार 548 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत 2 कोटी 92 लाख 19 हजार 543 घरांना भेटी देऊन पोलिओ डोस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 13 हजार 927 मोबाईल टीम संपूर्ण दिवसभर कार्यरत राहील, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.




























































