आधी उद्योग पळवले, आता बजेटमध्येही गुजरातला झुकते माप; आदित्य ठाकरे  यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाटय़ाला काहीच आलेले नाही. प्रकल्प महाराष्ट्राचे पळवले, पण अर्थसंकल्पात झुकते माप मात्र गुजरात आणि कर्नाटकला देण्यात आले आहे. हा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. हा महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पाबद्दल ही प्रतिक्रिया दिली. ज्या राज्यांमध्ये भाजपला राजकीय यश मिळाले आहे किंवा ज्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरेच काही देण्यात आले आहे, असे ते म्हणाले. महिला आणि तरुण यांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका त्यांनी केली.

भाजपला जास्त जागा मिळाल्या त्या राज्यांची विशेष काळजी

आदित्य ठाकरे म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन, एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवले. मुंबईचे वित्तीय पेंद्र गुजरातला नेण्यात आले. तरीसुद्धा महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काहीच देण्यात आले नाही. गुजरातसाठी मोठय़ा तरतुदी करण्यात आल्या आहेत. निवडणुकांमध्ये ज्या राज्यांमध्ये भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्या राज्यांची विशेष काळजी अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे.

घटनाबाह्य सरकार असूनही काहीच मिळाले नाही

कर्नाटकमध्येही येत्या निवडणुकांमध्ये भाजपला जास्त जागा मिळतील असे एक्झिट पोलचे आकडे आहेत. त्यामुळे कर्नाटसाठीही अर्थसंकल्पात खर्च करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईचा मात्र उल्लेखही नाही. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार असूनही काहीच मिळाले नाही, अशी टीका करतानाच आता यावर भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.