एकीकरण समितीचा मेळावा, महाराष्ट्रवासीयांना बेळगावात बंदी; बोम्मई सरकारची मुजोरी कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेळगावात होत असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या (सोमवार) महामेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याला अखेर कर्नाटक पोलिसांकडून सशर्त परवानगी दिली आहे. त्याचवेळी या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकने प्रवेशबंदी करून पुन्हा एकदा मुजोरी दाखवली आहे. दरम्यान, बेळगावात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

बेळगावात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाला दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा घेऊन विरोध करण्यात येतो. तसाच मोर्चा यंदाही आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र, गेले काही दिवस सीमावादावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत तणाव वाढला असल्याने हा मेळावा कर्नाटक पोलिसांच्या निशाण्यावर आहे. या मेळाव्याला परवानगीही देण्यात आली नव्हती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक झाली मात्र त्या बैठकीतही ठोस निर्णय दिला गेला नव्हता. त्यानंतर आज पोलिसांनी या मेळाव्याला सशर्त परवानगी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांचा मुजोर आदेश

सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेऊन ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिले असले तरी कर्नाटकची मुजोरी कायम आहे. एकीकडे बेळगावात होणाऱ्या एकीकरण समितीच्या मेळाव्याला पोलिसांनी शेवटच्या क्षणी परवानगी दिली असली तरी दुसरीकडे जाचक अटी घातल्या आहेत. या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे तुणतुणे वाजवत त्यास मनाई केली गेली आहे. महाराष्ट्रातील नेते वा नागरिकांना मेळाव्यासासाठी कर्नाटकात येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यासंबंधी आदेश काढला आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होत असताना शहरात भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून बंदी आदेश काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मेळाव्याला सशर्त परवानगी

बेळगाव पोलिसांनी काही अटींसह महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. बेळगावमधील टिळकवाडी येथील व्हॅक्सीन डेपो मैदानावर एकीकरण समितीचा हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उद्या सोमवारी हा मेळावा होणार आहे.