
मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दक्षिण-पश्चिमी वाऱयांमुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात बदल दिसत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली. उद्या 3 जून रोजी केरळात मान्सून दाखल होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
मुंबईतही मंगळवारी सकाळी आणि रात्री 12 वाजल्यानंतर काही भागांत जोरदार पाऊस बरसला. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मात्र अचानक आलेल्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, कोकणात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीकामांनाही सुरुवात झाली आहे.
आठवडाभरात मान्सून सक्रिय होणार
काहीसा रखडलेला मान्सून 3 जूनला केरळात दाखल झाल्यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान तज्ञ डॉ. के. एस. होसाळकर यांनी ट्विटरवर वर्तवला आहे. पश्चिमी वाऱयांचा वेग वाढल्याने पावसासाठी आवश्यक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ढगाळ वातावरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पावसाची नोंद मिलीमीटर
- मुंबई शहर 0.30
- पूर्व उपनगर 8.61
- पश्चिम उपनगर 11.43




























































