राज्यावर अवकाळीचे संकट कायम; गुरुवारनंतर पावसाचा जोर ओसरणार

राज्यासह देशाच्या हवामानात काही दिवसांपासून मोठा बदल होत आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या झळा बसत आहेत. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे. हवामान खात्याने राज्यात काही भागात अवकाली पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे काही जिल्ह्याता पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु झाली. आणखी दोन दिवस राज्यात अवकाळीचे संकट कायम राहणार असून त्यानंतर अवकाळी पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, मारेगाव, वणी, कळंब, राळेगाव तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील दोन ते तीन दिवस दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, पुणे, मुंबई आणि किनापट्टीच्या भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात उन्हाचा कडाका वाढला होता. मात्र, अवकाळी पावसाने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यासह काही जिल्ह्यात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हवामान खात्याने विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक भागांत 25 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट झाली आहे.

अवकाळी पावसाची जोर 25 एप्रिलपर्यंत राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुढील दोन राज्याच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 एप्रिलपासून पावसाचा जोर ओसरणार असला तरी 28 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळणार आहे.