
राज्यातील दुष्काळाचे संकट तीव्र होत असतानाच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बहुतांश भागांना बसला आहे. मान्सूनने काढता पाय घेताच तापमानाने कहर केला असून अनेक जिह्यांतील तापमान 40 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. पुणे, नाशिक, मराठवाडय़ात उष्णतेची लाट धडकली आहे. तापमानातील या मोठय़ा बदलाने नागरिकांना हैराण केले आहे. याचदरम्यान हवामान खात्याने कोकणात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचे भाकीत केले असून काही जिह्यांना उष्णतेबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि आसपासच्या भागांत तापमान 36 अंशांच्या वर गेले आहे. 3 ऑक्टोबरला विक्रमी 37.4 अंश कमाल तापमान होते. हे तापमान 2013 नंतरचे ऑक्टोबरमधील सर्वाधिक तापमान म्हणून नोंद झाले.
रब्बी पिकांवर संकट
वातावरणातील विचित्र बदलाचा मोठा फटका राज्यातील बळीराजाला बसला आहे. तापमानवाढ कायम राहिल्यास रब्बी पिके संकटात सापडण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. जागतिक संघटनांच्या इशाऱयानुसार नजीकच्या काळात कोरडय़ा हवामानाचा धोका वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अमरावतीमध्ये सर्वाधिक तापमान
राज्याच्या ग्रामीण भागात उन्हाची धग दिवसेंदिवस वाढत आहे. तापमानात अचानक सरासरीपेक्षा चार अंशांची मोठी वाढ झाल्यामुळे दुपारच्या उन्हात घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी प्रचंड दमछाक होत आहे. अमरावती जिह्यात मागील तीन दिवसांपासून तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. मंगळवारी राज्यातील सर्वाधिक 39.6 अंश तापमान अमरावतीमध्ये नोंद झाले. याव्यतिरिक्त चंद्रपूरमध्ये 37. बुलढाण्यात 36. ब्रह्मपुरीमध्ये 35.4 तसेच वाशीममध्ये 36 अंश इतके कमाल तापमान होते.
























































