ते काल हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालेत; उत्तम जानकरांचा अजित पवारांवर निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रातील माढा मतदारसंघ चर्चेत होता. येथील उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. त्यातच भाजपाने उमेदवारी दिली नसल्याने नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची वेळ असल्याने आपण मोहिते-पाटील यांच्यासोबतचा वाद मिटवल्याचे उत्तम जानकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी अजित पवार यांच्यावरही सडकून टीका केली.

याआधी महायुतीसोबत असलेल्या जानकर यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवार काल हत्ती होते, आता त्यांचे उंदराचे पिल्लू झाले आहे, असे जानकर म्हणाले. आजचे अजित पवार आणि मागच्या पाच-दहा वर्षांतील अजित पवार यांच्यात हा फरक दिसून येत आहे. त्यामुळे आपण शरद पवार यांच्यासोबत आल्याचे त्यांनी सांगितले.

एका सभेत उत्तम जानकर म्हणाले की, आज परकीयांनी आक्रमण केलेले नाही, स्वकीयांनी आक्रमण केले आहे. ज्याला किल्लेदार म्हणून नेमले, ज्याच्या ताब्यामध्ये हा किल्ला दिला होता तोच माणूस फितूर झाला, त्यामुळे तुम्हा बारामतीकरांना आणि संपूर्ण राज्याला, या मतदारसंघाला एक मोठा धक्का बसला. अजित पवार यांना आपण 30 वर्षांपासून बघत आहोत. अजित पवार काल हत्ती होते, मात्र आज उंदराचे पिल्लू झाल्यासारखे वाटत आहेत. त्यांची काय अवस्था झालेली आहे, असा टोलाही जानकर यांनी लगावला.

भाजपने पक्ष फोडला, 40 आमदार सोबत नेले. तरीही त्यांचे समाधान झाले नाही. आता त्यांनी बारामतीवरच हल्ला करायचा हे ठरवले आहे. त्यामुळे या राजकारणाबद्दल आमच्यासारख्या तरुणामध्ये घृणा निर्माण झाली. आमची मागच्या दहा वर्षांत फसवणूक झाली. मोहिते पाटील यांनाही बाजूला ठेवण्यात आले. त्यामुळे वैर संपवत मी आणि मोहिते पाटील एकत्र आलोय. आता 1 लाख 80 हजारांचे मताधिक्य माळशिरस तालुक्यातून घ्यायचे आहे. यात कमी पडलो तर मी राजकारण सोडून देईन, असेही जानकर म्हणाले.