
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राजपथावरील पथसंचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकपसंती या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जैवविविधता व राज्य मानके यंदाच्या चित्ररथाची संकल्पना होती. विविध राज्यांच्या चित्ररथाला ऑनलाइन मतदान झाले. यामध्ये महाराष्ट्राने 23 टक्के मते मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. चित्ररथाची संकल्पना रेखाचित्र व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि कलादिग्दर्शक रोशन इंगोले यांची होती.
असा होता महाराष्ट्राचा चित्ररथ
चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्लू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रुंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफूल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोटय़ा आकर्षक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठय़ा आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी व युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ होते.
उत्तर प्रदेशला पहिला क्रमांक
उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आले. उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर वाराणसी, काशी विश्वेश्वरधामचा देखावा साकारला होता. यंदाच्या संचलनात 12 राज्यांचे व आणि नऊ मंत्रालयांचे मिळून 21 चित्ररथ सहभागी झाले होते.





























































