आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील बंगल्यावर भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली. शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी केला तर यापुढे तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
भास्कर जाधव यांच्या बंगल्यावरील हल्ल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातच जाधव यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. जाधव यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टम्प आढळल्याचे सांगितले जात आहे. यानंतर विनायक राऊत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव हल्ले झेलण्यासाठी समर्थ आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ते गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. भास्कर जाधव अथवा शिवसैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांविषयीची राजकीय परिस्थिती मांडली म्हणून भास्कर जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याची पायमल्ली आहे. शिंदे सरकारकडून आमचे नेते, उपनेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अशा पद्धतीने तोंड बंद करण्याचे प्रयत्न होत असेल, तर आम्ही घाबरणार नाही, असेही विनायक राऊत यांनी ठणकावले.
भास्कर जाधव यांच्या घराच्या ठिकाणी दोन पोलीस कॉन्स्टेबल कायम बंदोबस्तासाठी ठेवले होते. परंतु रात्री अचानक बंदोबस्त का हटवण्यात आला, कोणाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, असे सवालही राऊत यांनी केले. या हल्ल्यामागे असलेल्यांना तात्काळ ताब्यात घ्या, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.




























































