
>> महेंद्र पाटील
प्रत्येक क्षणाच्या, प्रत्येक आठवणीच्या, जुन्या विरून गेलेल्या दिवसांच्या, मनात जपलेल्या, काही मनात लपलेल्या अशा सावल्या…
हव्याहव्याशा, मनाला दूर लोटणाऱ्या, मनाला वेड लावणाऱ्या, काही घुसमटणाऱ्या, काही कुजबुजणाऱ्या, काही एखाद्या जखमेसारख्या भळभळणाऱ्या सावल्या…
उनाड वाटेवरला दिशाहीन प्रवास, बेसावध आणि चुकलेला श्वास, सावल्या गहिऱ्या खोल… कधी उदास, वेडय़ा तर कधी हसऱ्या सावल्या …
अशा असंख्य सावल्या आपल्या आयुष्याच्या वाटेवर मनाच्या अंगणात असतात. त्यांना सोबत घेऊन आपण जगत असतो. ‘पुन्हा सावलीची मला वेडी आशा’ या माझ्याच कवितेच्या ओळी मी परवा संध्याकाळी पुन: पुन्हा आठवत होतो. काय जादू आहे त्या शब्दांमध्ये…हा विचार करत अर्थ शोधू लागलो. त्या शब्दांचं कारण उन्हाच्या तृप्त झळांत भाजून निघालेलं माझं मन नेहमी याच ओळी का आठवत असतात? याचं उत्तर मला शोधायचं होतं. त्या वेडय़ा मनाला आता सावलीची आशा लागली होती आणि त्याला ती सावली शोधून पुन्हा सुखी व्हायचं होतं. पुन्हा अनुभवायचे होते ऋतू हसऱ्या गोड क्षणांचे, पण त्याला काय ठाऊक, सावली ही क्षणिक असते. ती या सृष्टीची दासी आहे. तिला स्वतचं असं अस्तित्वच नाही. जसजसा सूर्य तळपत मावळतीला जातो, त्याप्रमाणे सावलीसुद्धा आपलं रूप बदलत जाते. एखादी ज्योत वारा आला की, त्या वाऱ्याप्रमाणे जसा आकार घेते तशीच तिची सावली अस्थिर होते. चंद्राची सावली रात्र सरकली की, नाहीशी होते. अशा या बेभरवशाच्या सावल्यांसारख्याच आठवणींच्या सावल्या असतात. तरीही आपण का तरसत असतो उगाच? वेडय़ासारखी वाट पाहत आपल्या आयुष्यातले काही अनमोल दिवस वाया घालवतो. माहीत असतं, यावेळीसुध्दा ती सावली धोका देणारच आहे, पण तरीही ती अनामिक ओढ का त्या सावलीची? मनाला का कळत नाही हा खेळ सावल्यांचा? मी विचार करतो तेव्हा एक गोष्ट मात्र कळते. सावल्या खूप सावधपणे खेळतात आपल्या मनाशी. त्यांना आपल्या मनाचा आधार हवा असतो. म्हणून कायमचं घर करून आपल्याच मनात राहून आपल्याला खूप अस्वस्थ करत राहतात. हा असा खेळ दिवसरात्र सुरू असतो. आपल्या मनात रोज नवे क्षण, रोज नव्या भेटी, रोज नवं सुख, रोज नवी दुःखं असे सगळे अनुभव दिवसागणिक मागे पडतात आणि त्याचं रूपांतर आठवणींच्या सावल्यांमध्ये होतं. पुन्हा तेच सुख अनुभवायला त्या सावलीत जाणं आणि जगणं काही काळ खूप छान वाटतं, पण त्या मागोमाग येणारी एखादी दुःखाची सावली खूप त्रास देऊन जाते. मग नकोशा वाटतात त्याच सावल्या मनाला. हे सारं असूनही यातून आपल्या मनाची सुटका कधी होत नाही. कारण त्यांना पक्कं ठाऊक असतं, ज्या दिवशी आपलं मन त्या सावल्यांपासून दुरावेल, त्याच क्षणी आपलं अस्तित्वही कायमचं संपेल आणि म्हणून मीसुद्धा त्या विचारातून बाहेर पडून पुन्हा त्याच वळणावर येऊन थांबलो. माझ्या मनातून एक आवाज आला…




























































