
जुना कुलर ओएलएक्स वेबसाईटद्वारे विक्री करताना सायबर चोरट्याने तरूणाला तब्बल २ लाख ८० हजारांचा गंडा घातला आहे. सायबर चोरट्याने तरूणाला वेळोवेळी फोन करून पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने ऑनलाईनरित्या फसवणूक केली आहे. ही घटना २१ मार्चला महमंदवाडीत घडली आहे. याप्रकरणी परेश माथूर (४४) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
परेश एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना जुना कुलर विकून नवीन घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी ओएलएक्स वेबसाईटवर कुलरविक्रीची जाहिरात दिली. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना फोन करून कुलर घ्यावयाचे सांगून पैसे पाठविण्याच्या आमिषाने क्यूआर कोड स्कॅन करायला सांगितला. त्यानुसार सायबर चोरट्याने परेश यांना रिफंडच्या बहाण्याने बँकखात्यातून वेळोवेळी २ लाख ८० हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद तपास करीत आहेत.

























































