महावितरणचा भोंगळ कारभार; आदेश एका वीज बिलाच्या वसुलीचे, पण अधिकारी घेताहेत दोन बिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱयांकडून चालू एक वीज बिल वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महावितरणच्या अधिकारी-कर्मचारी ग्रामीण शेतकऱयांकडून दोन वीज बिले वसूल करत असल्याचे महावितरणच्या मुख्यालयातील एका पत्रावरून समोर आले आहे. अधिकारी-कर्मचाऱयांच्या या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱयांकडील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने नुकतीच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली होती. याबाबत शेतकऱयांनी आंदोलन केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत चालू वीज बिल भरणाऱया शेतकऱयांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार महावितरणनेही आपल्या विभागीय कार्यालयांना त्याबाबत निर्देश दिले. तरीही अनेक ठिकाणी अधिकारी-कर्मचारी शेतकऱयांना दोन वीज बिले भरण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेत महावितरणने अंतर्गत परिपत्रक काढत शेतकऱयांकडून केवळ चालू वीज बिल वसूल करावे. कोणीही दोन बिलांच्या वसुलीसाठी सक्ती करू नये असे निर्देश दिले आहेत. यावरून महावितरणचे फिल्डवरील अधिकारी-कर्मचारी ऐकत नसल्याचे दिसते.