
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी येथील फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटामुळे पाच महिला मृत्युमुखी पडल्या होत्या. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला तमिळनाडू येथून अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे.
नाना शिवाजी पाटेकर (रा. गणेशनगर, धाराशिव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी येथे बेकायदेशीररीत्या नाना पाटेकर व त्याचे सहकारी फटाका कारखाना चालवीत होते. 1 जानेवारी रोजी भरदुपारी या कारखान्यात स्फोट झाल्याने पाच महिला मृत्युमुखी पडल्या, तर तीन महिला गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी पांगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांतील नाना शिवाजी पाटेकर हा गेल्या महिनाभरापासून पोलिसांना चुकवीत होता. तपासादरम्यान पाटेकर हा तमिळनाडूतील मदुराई-शिवकाशी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिवकाशी येथे जाऊन त्याला अटक केली. आज त्याला न्यायालयात उभे केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड, हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान, हरिदास पांढरे, कॉन्स्टेबल समर्थ गाजरे, दिलीप थोरात, पोलीस नाईक मोरे यांनी ही कारवाई
केली आहे.
























































