उगवते तारे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विठ्ठल देवकाते , मुंबई

कॉलेजचा पहिला दिवस असो वा आवडत्या मुलीला केलेला पहिला प्रपोज किंवा मधुचंद्राची पहिली रात्र, या सर्वांमध्ये एक अनोखा उत्साह आणि तितकीच भीतीसुद्धा दडलेली असते.  अशीच काहीशी अवस्था पहिला वर्ल्ड कप खेळणाऱया क्रिकेटपटूंची असणार आहे. देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळावं असं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्यानंतर वर्ल्ड कपसारख्या सर्वोच्च स्पर्धेत अंतिम अकरामध्ये संधी मिळण्यासाठी खेळाडू जीवाचं रान करत असतो. त्यामुळे यंदा वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणाऱया ‘टीम इंडिया’तील उगवत्या ताऱयांमध्ये ‘कोण हिरो ठरणार अन् कोण झीरो’ याकडे तमाम क्रिकेट शौकिनांच्या नजरा असणार आहेत.

 संकटमोचक हार्दिक पांडय़ा

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक लक्ष असेल ते अष्टपैलू हार्दिक पांडय़ाच्या कामगिरीवर. कारण हा खेळाडू प्रथमच विश्वचषक खेळणार असला तरी 45 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. 25 वर्षीय हार्दिक पांडय़ाने मधल्या फळीत खेळताना अनेकदा आपल्या संघासाठी संकटमोचकाची भूमिका चोखपणे बजावली आहे. त्याचा दिवस असल्यास तो गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरतो. शिवाय मोक्याच्या वेळी संघाला बळी मिळवून देणारा गोलंदाज म्हणूनही त्याची ख्याती आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तो ‘टीम इंडिया’चा हुकमाचा एक्का ठरण्याची शक्यता आहे.

 युझवेंद्र–कुलदीप फिरकीची जोडगोळी

युझवेंद्र चहल व कुलदीप यादव या फिरकीच्या जोडगोळीने अलीकडच्या काळात अफलातून गोलंदाजी करीत ‘टीम इंडिया’तील आपले स्थान पक्के केले. 28 वर्षीय युझवेंद्र आपल्या लेगब्रेक गोलंदाजीने फलंदाजांना जखडून ठेवतो व हळूच सावजही टिपतो. 41 एकदिवस व 31 टी-20 सामन्यांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. याचबरोबर डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची कामगिरीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. हा 24 वर्षीय गोलंदाज चेंडू वळविण्यात माहीर आहे. मात्र, 44 एकदिवसीय व 18 टी-20 सामने खेळलेल्या कुलदीपची इंग्लंडमध्ये कसोटी लागणार आहे.

मधल्या फळीचा आधारस्तंभ केदार

मराठमोळ्या केदार जाधवचा रोलही यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मोलाचा ठरणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा आवडता अष्टपैलू खेळाडू असलेल्या केदारने तंत्रशुद्ध फलंदाजी करताना अनेकदा आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलेले आहे. शिवाय, प्रमुख गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर केदारची कामचलाऊ फिरकी गोलंदाजीही वेळोवेळी उपयोगी पडलेली आहे. 59 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेला हा असलेला हा छोटेखनी चणीचा खेळाडू ‘टीम इंडिया’च्या मधल्या फळीचा आधारस्तंभ होय. वयाच्या 34व्या वर्षी त्याला विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली आहे.

 अनोख्या शैलीचा जसप्रीत बुमराह

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत 25 वर्षीय जसप्रीत बुमराह हा ‘टीम इंडिया’च्या गोलंदाजी ताफ्यातील मुख्य अस्त्र्ा असणार आहे. आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे तो फलंदाजांना बुचकळ्यात टाकतो. 49 एकदिवसीय व 42 टी-20 सामन्यांचा अनुभव पाठीशी असलेल्या या खेळाडूची डेथ ओव्हरमध्ये संघाला हमखास बळी मिळवून देणे ही खासीयत आहे. भन्नाट यॉर्कर, योग्य टप्पा व दिशा आणि गोलंदाजीतील वैविध्य  या त्याच्या जमेच्या बाजू होत.

 अष्टपैलू विजय शंकर

अष्टपैलू विजय शंकर यंदाचा वर्ल्ड कप गाजविण्यासाठी सज्ज झालाय. सर्वाधिक कमी अनुभव म्हणजे केवळ 9 आंतरराष्ट्रीय सामने या खेळाडूने खेळलेले आहेत. मात्र, न्यूझीलंड दौऱयावर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये लक्षवेधी कामगिरी करून त्याने निवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडले. ताकदवर फटके मारण्यात तो माहीर आहे. शिवाय संघासाठी हा 28 वर्षीय खेळाडू मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो.

 लोकेश राहुल शैलीदार फलंदाज

लोकेश राहुल या ‘टीम इंडिया’तील आघाडीचा शैलीदार फलंदाज होय. गतवर्षी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना तो खऱया अर्थाने नावारूपाला आला. या तंत्रशुद्ध फलंदाजाचा भाता विविध स्ट्रोक्सनी सज्ज आहे. इंग्लंडमध्ये टी-20 लढतीत शतक ठोकून त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. शिवाय तो एक चपळ क्षेत्ररक्षकही आहे. 27 वर्षीय लोकेश राहुलने 34 कसोटी, 14 एकदिवसीय व 27 टी-20 सामने खेळलेले आहेत.