माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजुर बिनविरोध; भाजपची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर पालिकेचे नगराध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया सुरू असताना शुक्रवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा उमेदवाराने माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख मंजुर यांची बिनविरोध निवड झाली असून आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे. दरम्यान भाजप निवडणुकीस सामोरे जाण्याऐवजी माघार घेतल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चार वर्षापूर्वी माजलगाव नगर पालिकेची निवडणुक झाली होती. यावेळी नगराध्यक्ष निवडणुक ही जनतेतून होवून भाजपा -जनविकास आघाडीचे सहाल चाऊस हे विजयी झाले होते. पालिकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चाऊस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. या दरम्यान ते सतत तीन महिन्यापेक्षा जास्त गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकारी यांनी अध्यक्षपद रिक्त केले. त्यानंतर नवीन नियमानुसार नगरसेवकांमधून अध्यक्ष करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून रेश्मा दीपक मेंडके यांनी तर राष्ट्रवादीकडून शेख मंजूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान आज शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या सौ. रेश्मा दीपक मेंडके यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शेख मंजूर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.