
सामना प्रतिनिधी । लातूर
संसदेत तात्काळ कायदा बनवून अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर उभारावे तसेच शहरातील उद्योगभवन कॉम्प्लेक्स येथील जिन्यामध्ये ‘कोणीही थुंकू नये’ यासाठी हिंदूंचे आराध्य देवी देवतांचे चित्र असलेल्या फरशा लावण्यात आल्या आहेत. या देवतांच्या फरशांमुळे देवतांचे विडंबन होत असल्याचे काही धर्मप्रेमींच्या लक्षात आले असता देवतांची विटंबना थांबावी, यासाठी उद्योग भवनचे संचालक ओमप्रकाश ब्रीजवसी, तसेच उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांना निवेदन देण्यात आले.
‘देवतांच्या फरशांमुळे लातूर येथील समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून धार्मिक भावना दुखावणे, हे भारतीय दंड विधानानुसार २९५ अ प्रमाणे दखल पात्र गुन्हा आहे. देवतांचे चित्र असलेल्या लाद्या त्वरित काढून हिंदूंच्या भावनांचा आदर करावा.’या वेळी निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दिलीप मुसळे, सिद्धनाथ चव्हाण, श्रीराम जोशी, आकाश चव्हाण, अधिवक्ता गिरीधर बोटवे, विक्रम रेड्डी, अतुल कुलकर्णी, अधिवक्ता अरविंद कुलकर्णी, मुकेश पाठक, निगुडगे रत्नदिप, योगेश चामे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरुण कुलकर्णी, श्री. विक्रम घोडके, कु. केताली कुलकर्णी, सौ. अरुणा कुलकर्णी आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
























































